भारताच्या अर्जुन एरिगेसीने जागतिक जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने दोहा येथे झालेल्या या स्पर्धेत दोन्ही प्रकारांत ब्राँझपदक जिंकले. विश्वनाथन आनंदने यापूर्वी २०१७च्या स्पर्धेत दोन पदके जिंकण्यात यश मिळवले होते. त्यानंतर दुहेरी यश मिळवणारा अर्जुन पहिलाच बुद्धिबळपटू ठरला आहे.
अर्जुन एरिगेसी मंगळवारी सांगता झालेल्या अतिजलदच्या प्राथमिक टप्प्यानंतर १४.५ गुणांसह अव्वल आला होता. मात्र, त्याला उपांत्य फेरीत नॉदिरबेक अब्दुसात्तारोव याच्याविरुद्धच्या लढतीत ०.५-२.५ अशा पराभवास सामोरे जावे लागले. या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभूत खेळाडूस ब्राँझपदक देण्यात येते. त्यामुळे अर्जुनचा तिसरा क्रमांक निश्चित झाला. त्याने जलद स्पर्धेतही ही कामगिरी केली होती.
भारतातील बुद्धिबळ रसिकांनी अर्जुनवर टीका केली आहे. ‘तो प्राथमिक फेरीत चांगली कामगिरी करून मोक्याच्या वेळी पराभूत होतो,’ अशी टीका चाहत्यांनी केली आहे. त्याहीपेक्षा त्यांना या स्पर्धेतील निहाल सरीनविरुद्धची बरोबरी जास्त खटकत आहे.
दिव्या देशमुख महिलांच्या अतिजलद स्पर्धेत भारतीयांत सर्वोत्तम आली. मात्र, तिला १५ फेऱ्यानंतर २२व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिचे नऊ गुण झाले. सर्वोत्तम आलेल्या आसुबायेवा बिबिसारा हीच्यासह पाच जणींचे प्रत्येकी ११ गुण होते. कोनेरू हम्पीनेही दिव्याप्रमाणेच नऊ गुण मिळवले. चार्वी ए, रमेशबाबू वैशाली, द्रोणावली हरिका यांचे प्रत्येकी ८.५, तर पद्मिनी रौत, प्रियांका नुताकी यांचे प्रत्येकी ७.५ गुण झाले.






