अपहृत मुलाची दोन तासांत सुटका

महाराष्ट्र टाइम्स

पुणे आणि सातारा पोलिसांनी एका १८ वर्षीय मुलाची दोन तासांत सुटका केली. भरदुपारी त्याचे अपहरण झाले होते. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या मदतीने पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. अपहरणकर्त्यांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी मुलाला सोडून पळ काढला. पोलिसांनी मुलाला सुरक्षितपणे त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.

police rescued abducted child in two hours

घरी जाताना भरदुपारी अपहरण करून कारमधून घेऊन गेलेल्या १८ वर्षांच्या मुलाला अवघ्या दोन तासांत शोधण्यात पुणे व सातारा पोलिसांना यश आले. यामध्ये मोलाची कामगिरी बजावल्याची माहीती ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ट विभागीय अधिकारी गणेश लोकरे यांनी दिली.

ही घटना पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावच्या पुलाखाली मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास घडली. पृथ्वीराज लखनशेठ दळवी (वय १८, रा. कापूरहोळ, ता. भोर)असे अपहृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मांडकी ता.पुरंदर येथे गुन्हा दाखल झाला असून तो पुढील तपासाकरीता राजगड पोलिसांकडे वर्ग झाला आहे. त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला मुलाच्या अपहरणाची माहिती दिली. ग्रामसुरक्षा यंत्रणेने पुणे व सातारा जिल्हयातील राजगड,खंडाळा,जेजूरी, सासवड, सारोळा, भुईंज, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याला दिली. त्यानुसार नाकाबंदी करून पोलिस यंत्रणा कामाला लागली. स्थानिक पोलिसांनी शोध मोहीम सुरू केल्याची कुणकुण अपहरणकर्त्यांना लागल्यामुळे त्यांनी पुरंदर तालुक्यातील मांडकी येथे पृथ्वीराजला गाडीसह सोडवून पळ काढला. पोलिसांचे पथक व वडील मांडकीमध्ये गेल्यावर त्यांना पृथ्वीराज सुरक्षित आढळला. पोलिसांनी पृथ्वीराजला वडीलांच्या हवाली केले, त्यामुळे मुलाच्या वडीलांचा जीव भांड्यात पडला.