फलंदाजांचे नंदनवनच?

Contributed byसंजय घारपुरेsanjay.gharpure@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईत होणाऱ्या भारत-इंग्लंड उपांत्य लढतीसाठी फलंदाजीस अनुकूल खेळपट्टी तयार केली जात आहे. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध याच फॉर्म्युल्याने यश मिळाले होते. वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांना साथ देईल. अरबी समुद्रावरून येणारे वारे सुरुवातीला स्विंग देऊ शकतात. कमी अंतराच्या सीमारेषा चौकार, षटकारांना प्रोत्साहन देतील. भारतीय संघाला या खेळपट्टीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

फलंदाजांचे नंदनवनच?

मुंबई : भारतीय संघाने आपली फलंदाजी बहरात आणण्यासाठी काही सामन्यांपासून फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर खेळण्याचा निर्णय घेतला आहे. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात हा फॉर्म्युला यशस्वी ठरला होता, आता हाच फॉर्म्युला गुरुवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत अमलात येणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

भारत आणि इंग्लंड ही उपांत्य लढत खेळपट्टी क्रमांक सातवर होईल. याच खेळपट्टीवर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील गटसाखळी लढत झाली होती, असे मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) सुत्रांनी सांगितले. याच मैदानावर भारताची स्पर्धेतील लढत झाली होती. मात्र त्यावेळी भारतीय फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. मात्र तो सामना झालेल्या खेळपट्टीचाच पुन्हा वापर उपांत्य फेरीच्या लढतीसाठी न करण्याचा निर्णय झाला आहे.

उपांत्य फेरीचा सामना होणार असलेल्या खेळपट्टीचा इंग्लंडला अनुभव आहे. मात्र त्या सामन्यांत इंग्लंडचे गोलंदाज तसेच फलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे इंग्लंडला ३० धावांनी हार पत्करावी लागली होती. शेरफिन रुदरफर्डच्या आक्रमक ७६ धावांमुळे विंडीजने १९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव १९ षटकांत १६६ धावांवर आटोपला होता. या खेळपट्टीचा इंग्लंडला अनुभव असला तरी ती फलंदाजीस अनुकूल होती. त्याच प्रकारची खेळपट्टी असेल, असेही अन्य एका सुत्रांनी नमूद केले.

वानखेडे स्टेडियमवर भारतीय तसेच इंग्लंडचा संघ सराव करीत असताना खेळपट्टी तयार करण्याची पूर्वतयारी सुरू होती. या खेळपट्टीवर सध्या काहीसे गवत दिसत होते. त्यातही क्रीझ शेजारील गवत जास्त लक्ष वेधून घेत होते. सामना सुरू होईपर्यंत या गवताची नक्कीच पूर्ण छाटणी होईल, मात्र खेळपट्टी ‘ब्रेक’ होणार नाही ही काळजी घेतली जाणार आहे. खेळपट्टीवरून चेंडू चांगली उसळी घेईल तसेच अरबी समुद्रावरून वाहणारे वारे दोन स्टँडच्या जागेमधूनही स्टेडियममध्ये येतात. त्यामुळे सुरुवातीच्या काही षटकांत चेंडू स्विंगही होऊ शकतो.

वानखेडेची खेळपट्टी प्रामुख्याने फलंदाजांनाच साथ देते. त्याचबरोबर तुलनेत कमी अंतरावरील सीमारेषाही चौकार, षटकारांच्या आतषबाजीस साथ देते. गतवर्षी याच मैदानावर भारताने इंग्लंला २४७ धावांचा चोप दिला होता. मात्र यंदाच्या स्पर्धेत या मैदानावर केवळ एकदाच दोनशेपेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजांना नेपाळने सतावले होते. त्यातच दवही पडण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेतील प्राथमिक साखळीतील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यांत त्यानंतर सुपर ८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजी अपयशी ठरली होती. अन्य सामन्यांतही एकत्रित बहरली नव्हती. त्यामुळे झिम्बाब्वे (४ बाद २५६) आणि वेस्ट इंडिज (४ बाद १९५) विरुद्धच्या सामन्याच्यावेळी फलंदाजीस साथ देणारी खेळपट्टी तयार करण्यात आली. भारतीय संघाने गेल्या काही वर्षात मायदेशातील टी-२० लढतीत फलंदाजीस अनुकुल खेळपट्ट्यांवरच यश मिळवले होते. हाच फार्म्युला उपांत्य फेरीच्यावेळीही असेल, अशी चिन्हे दिसत आहेत.