प्रेक्षकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने मागील वर्ल्ड कप अंतिम सामन्यात भारतीय प्रेक्षकांना शांत ठेवले होते. इंग्लंडचा संघही याच रणनीतीवर काम करत आहे. सॅम करनने सांगितले की, स्टेडियमचे वातावरण शांत ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आयपीएलच्या अनुभवामुळे भारतीय मैदानांची कल्पना आहे. हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

प्रेक्षकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न

दोन वर्षापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप वनडे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताचा पराभव केला होता, त्यावेळी, ‘भारतीय प्रेक्षकांना शांत ठेवण्यात यश आल्यास आम्ही जिंकू’, असे पॅट कमिन्सने सांगितले होते. आता इंग्लंडही गुरुवारी भारताविरुद्धच्या वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्याच्यावेळी हेच लक्ष बाळगून आहे.

या स्पर्धेचा विचार केल्यास इंग्लंडचा संघ वानखेडे स्टेडियम वर दोन सामने खेळला आहे, तर भारतीय संघ एकच. मात्र उपांत्य लढतीच्यावेळी चाहते भारतीय संघास पूर्ण जोषात प्रोत्साहित करणार. ‘वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक आहे. या स्टेडियममध्ये कमालीचे वातावरण असते. मात्र हे स्टेडियम गुरुवारी रात्री खूप शांत असेल,’ अशी टिप्पणी इंग्लंडचा खेळाडू सॅम करनने मंगळवारी केली. ‘आम्ही या मैदानावर अनेक सामने खेळलो आहोत. ते आमच्यासाठी नक्कीच अनोळखी नाही. दोन दिवस सराव करणार आहोत, त्यामुळे सामन्याच्यावेळी कसे वातावरण असेल याचाही अंदाज येईल,’ करन म्हणाला.

गेल्या दोन स्पर्धांत भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत झाली आहे. त्यात दोघांनी प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे. त्याचबरोबर इंग्लंड संघातील सुमारे १२ खेळाडूंना आयपीएलचा अनुभव आहे. त्यामुळे या सामन्यांत व्यूहरचना महत्त्वाची असेल, हेच करन सूचवत होता. ‘या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चारपैकी तीन संघ भारतीय उपखंडाबाहेरील आहेत. या संघांनी वातावरणाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेत खेळ केला, हेच यावरून दिसते. आयपीएलमुळे अनेकांना भारतातील मैदानांबाबत चांगली कल्पना आहे’, असेही तो म्हणाला.