झ्या आठवणींच्या गुच्छातून सतत डोकावणारा हा फोटो नव्हे, तर हे स्मृतीचित्र आहे. सन १९७५मध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल, गादेगाव’ (ता. पंढरपूर) या ठिकाणी इयत्ता दहावीचा निरोप समारंभ दाखवणारा हा फोटो आहे. आज या घटनेस ५० वर्षं झाली. खरं तर तेव्हा फोटो काढण्याची फारशी प्रथा नव्हती. ग्रामीण भागात तर अगदीच नव्हती. खूपच महत्त्वाचा कार्यक्रम असेल, तर एखादा फोटोग्राफर बोलावला जाई आणि तोही कृष्णधवल छायाचित्रं काढत असे.
इयत्ता दहावीच्या माझ्या शालेय निरोप समारंभाचा हा फोटो मी आजही जेव्हा जेव्हा निरखून पाहतो, तेव्हा मनात अनेकानेक आठवणी जाग्या होतात. विचार फेर धरू लागतात आणि या छायाचित्रातील प्रत्येक शिक्षक पाहून मन भरून येतं. आमचे सर्व शिक्षक खुर्चीवर बसलेले आहेत. फोटोत मध्यभागी प्रमुख पाहुणे ज्यांनी हाफ शर्ट घातला आहे, ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बेळंबे आहेत. पुढं ते राज्याचे आरोग्य संचालक झाले.
इतरांमध्ये सगळे मित्र, त्यात काही बसलेले, काही उभे असणारे दिसतात. आमच्या वर्गात एकच विद्यार्थिनी होती व एकच शिक्षिका होत्या. या सर्वांचे चेहरे पाहिले, की त्यांचे स्वभाव आजही आठवतात. त्यांच्याशी केलेल्या खोड्या, गमती, चेष्टा, विनोद, अभ्यास, अभ्यासात असणारी स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा असं सारं आजही सर्व प्रसंगांसह डोळ्यांसमोर उभे राहतात. या आठवणी डोळ्यांच्या कडा ओलावतात. यातले काही शिक्षक व काही मित्र देवास प्रिय झाले; त्यांच्या आठवणीनं मन आजही गहिवरतं आणि आठवणीचा बांध फुटतो, खूप काही आठवत राहतं. हे छायाचित्र जणू तो कालखंड जपून आहे. आजच्या धकाधकीच्या जगण्यात मन जेव्हा त्या काळाच्या आठवणींमध्ये रमतं, तेव्हा तो कालपट समोर उभा राहतो. अशी ही स्मृतिचित्राची आठवण मनाला या काळातही सुखाचा ओलावा देते, इतकंच...






