हरमनप्रीत कौरच्या आक्रमक अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर १५ धावांनी मात केली. यासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असे धवल यश मिळवले. भारतीय महिला संघाने तिसऱ्यांदा ही कामगिरी केली; पण पहिल्यांदाच मायभूमीत हे यश मिळवले आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७५ धावा केल्या. श्रीलंकेला ७ बाद १६० धावाच करता आल्या. स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाच्या विजयात कर्णधार हरमनप्रीतचे अर्धशतक मोलाचे ठरले. त्याहीपेक्षा अरुंधती रेड्डी आणि अमनज्योत कौरच्या फटकेबाजीमुळे भारताने अखेरच्या चार षटकांत ४७ धावा केल्या होत्या. या दोघींनी केलेली ६१ धावांची भागीदारी; तसेच अरुंधतीने अखेरच्या षटकात केलेल्या वीस धावांमुळे भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. शेफाली वर्मा (५), गुनलम कामालिनी (१२), हर्लिन देओल (१३), रिचा घोष (५), दीप्ती शर्मा (७) एकापाठोपाठ बाद झाल्या. त्या वेळी भारताची ५ बाद ७७ अशी स्थिती होती. हरमनप्रीतने ४३ चेंडूंत नऊ चौकार व एका षटकारासह ६८ धावा केल्या. तिला मोलाची साथ देणाऱ्या अमनज्योत कौरने १८ चेंडूंत एक चौकार व एक षटकारसह २१ धावा केल्या, तर अरुंधती रेड्डीने ११ चेंडूंत चार चौकार व एका षटकारासह नाबाद २७ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना हसिनी परेरा आणि इमेशा दुलानीच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकेने ११ षटकांत १ बाद ८६ अशी सुरुवात केली होती. याचवेळी अमनज्योतने इमेशाला बाद केले. त्यांनी ६० धावांत सात फलंदाज बाद केले. दवाचा त्रास असूनही भारतीय फिरकी गोलंदाजांनी चेंडूवर राखलेले नियंत्रण निर्णायक ठरले. हसिनीने ४२ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ६५ धावा केल्या, तर इमेशाने ३९ चेंडूंत आठ चौकारांसह ५० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : भारत - २० षटकांत ७ बाद १७५ ( हरमनप्रीत कौर ६८, अमनज्योत कौर २१, अरुंधती रेड्डी नाबाद २७, निमशा मीपाजे ३-०-२५-१, कविशा दिलहारी २-०-११-२, रष्मिका सेवंदी ४-०-४२-२, चामरी अट्टापट्टू ३-०-२१-२) वि. वि. श्रीलंका - २० षटकांत ७ बाद १६० (हसिनी परेरा ६५, इमेशा दुलानी ५०, दीप्ती शर्मा ४-०-२८-१, अरुंधती रेड्डी २-०-१६-१, स्नेह राणा ४-०-३१-१, वैष्णवी शर्मा ४-०-३३-१, श्री चरणी ४-०-३१-१, अमनज्योत कौर २-०-१७-१). सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू : हरमनप्रीत कौर. मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू : शेफाली वर्मा.






