भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांसह इच्छुक तसेच अपक्षांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी काहींनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर तोपर्यंत आलेल्या उमेदवारांना टोकन देण्यात आले होते, अशी माहिती भिवंडी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
भिवंडी महापालिकेमध्ये एकूण ९० जागा असून ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॉँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असून समाजवादी पक्षही स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. तर, शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्र आले आहेत. शिवसेना-भाजपच्या युतीबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झाले नसले तरी मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.






