उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास शिल्लक असतानाही एबी अर्जावरून वाद सुरू होते. आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर ताटकळत उभे होते. तर उमेदवारी अर्ज मिळाल्यानंतर अनेकांची दमछाक सुरू होती.
उल्हासनगरमधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चार प्रभागांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था केली होती. मात्र राजकीय पक्षांच्या बंडखोरी टाळण्याच्या खेळीने शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज वाटप केल्याने अपेक्षेप्रमाणे निवडणूक अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या कार्यालयांमध्ये दुपारी १२ वाजेपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. काही दिग्गज उमेदवारांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिरवणूक काढल्याने या गर्दीत अधिक भर पडली. युती, आघाडीचा निर्णय न झाल्याने सर्वच पक्षांचे उमेदवार तसेच अपक्षांची ही गर्दीत भर पडली होती.
सर्वच निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारांची आलेली गर्दी पाहता अधिकारी चिंतेत होते. उमेदवारांसोबत येणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या गर्दीला आवरताना अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग होऊन पोलिसांचीही दमछाक झाली होती.
सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी
सर्वच राजकीय पक्षांची उमेदवार आपल्या पदाधिकाऱ्यांसह वाहनांचा ताफा घेऊन निवडणूक कार्यालयात पोहोचत असल्याने शहरातील सर्वात महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडीचा झाली होती.






