शेवटच्या दिवशी पक्षांतरांचा धडाका

महाराष्ट्र टाइम्स

उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय चित्र बदलले. अनेक इच्छुकांनी पक्षांतर केले. काही जणांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. शिवसेना आणि कलानी गट एकत्र आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढत आहेत. शिवसेना (उबाठा), मनसे आणि काँग्रेस यांनी आघाडी केली आहे. यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. बंडखोरांना शांत करणे पक्षांसाठी आव्हान असेल.

शेवटच्या दिवशी पक्षांतरांचा धडाका
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुक उमेदवारांची पळापळ, पक्षीय कार्यालयांत धावाधाव आणि पक्षांतरांचे नाट्य सुरू होते. इच्छित पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी विरोधी पक्षात प्रवेश करत अर्ज दाखल केले, तर काहींनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि कलानी गट यांची युती असून साई पक्षही या आघाडीचा भाग आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे शिवसेना (उबाठा), मनसे आणि काँग्रेसने आघाडी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उल्हासनगरच्या महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणे हे नवे नाही. यंदाही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकत्र असलेले शिवसेना ,भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीत मात्र एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. अर्ज भरण्याला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजप-शिवसेना युती होणार नसल्याची घोषणा झाल्याने अनेक इच्छुकांची मोठी कोंडी झाली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत आणि मंगळवारी दुपारपर्यंत अनेक उमेदवार एबी अर्जाच्या प्रतीक्षेत दिसून आले. अखेर उमेदवारी न मिळाल्याने काहींनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

उल्हासनगरमध्ये ७८ जागांसाठी निवडणूक होत असून चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार २० प्रभागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी होती. गोंधळ टाळण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चर्चेला उधाण

अखेरच्या क्षणी युवा सेना अध्यक्ष बाळा श्रीखंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभाग क्रमांक १मधून अर्ज दाखल केला. त्यांच्या सहकारी सुनील सिंग यांच्या पत्नीने साई पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री पाटील यांनी कलानी गटात प्रवेश केला. दुसरीकडे कलानी गटाचे निष्ठावंत मानले जाणारे संतोष पांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. याशिवाय अनेक उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने येत्या काळात बंडखोर उमेदवारांना थंड करणे हे सर्वच पक्षांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.