पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर शिक्षणाला पर्याय म्हणून नव्हे, तर मार्गदर्शन आणि मूल्यवर्धनासाठी करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानाला गुलाम होऊ न देण्याचा संकल्प करावा. नोकऱ्यांचे स्वरूप विकसित होईल, पण जीवन सुरूच राहील. तंत्रज्ञान समजून घेणे आणि क्षमतांचा विस्तार करणे महत्त्वाचे आहे. नेतृत्व म्हणजे इतरांना समजून घेणे आणि पटवून देणे.
‘कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर शिक्षणाला पर्याय म्हणून नव्हे, तर मार्गदर्शन आणि मूल्यवर्धनासाठी केला पाहिजे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना केले. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या नवव्या पर्वाच्या दुसऱ्या भागात बोलताना त्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावर भर दिला. तंत्रज्ञानाला घाबरण्याऐवजी त्याचा उपयोग कौशल्ये सुधारण्यासाठी करावा, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्वाचे गुणही शिकवले.
पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तंत्रज्ञान हे आपल्या जीवनाचा एक भाग बनले आहे. मोबाईलशिवाय जेवण न करणारी पिढी आज आपण पाहतो. पण प्रत्येक युगात नवीन तंत्रज्ञान आले आहे, मग ते संगणक असो वा मोबाईल. या तंत्रज्ञानामुळे आपल्याला चिंता वाटू शकते, पण ती अनावश्यक आहे. आपण तंत्रज्ञानाचे गुलाम नाही, तर त्याचे मालक बनले पाहिजे, असा दृढ संकल्प करायला हवा. कोइमतूर, रायपूर, गुवाहाटी आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी हे विचार मांडले.एआय (Artificial Intelligence) सारख्या नवीन तंत्रज्ञानाला घाबरू नका, तर त्याचा उपयोग तुमची कौशल्ये वाढवण्यासाठी करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. आपण एआय किंवा मोबाईलचे मास्टर बनले पाहिजे, असे ते म्हणाले. जसे पूर्वी बैलगाड्या होत्या आणि आता विमाने आहेत, त्याचप्रमाणे नोकऱ्यांचे स्वरूप नेहमीच बदलत राहील. पण जीवन मात्र सुरूच राहील. तंत्रज्ञान समजून घेणे, आपल्या क्षमता वाढवणे आणि त्याचा आपल्या कामात उपयोग करणे, यामुळे नक्कीच प्रगती होईल, असा कानमंत्र त्यांनी दिला.
नेतृत्व म्हणजे फक्त निवडणुका जिंकणे किंवा भाषणे देणे नव्हे, तर इतरांना समजून घेणे आणि त्यांना पटवून देणे, असे पंतप्रधान म्हणाले. खरे नेते लोकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यांना समजून घेतात. नेता होण्यासाठी पुढाकार घेण्याची वृत्ती विकसित करा. आपले विचार किमान दहा लोकांपर्यंत स्पष्टपणे आणि प्रभावीपणे पोहोचवण्याची क्षमता हा नेतृत्वाचा एक महत्त्वाचा गुण आहे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.