देशातील हवाई वाहतुकीचे क्षेत्र विस्तारत असताना यामध्ये महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. राज्यात एकूण १३ विमानतळ असून, त्यापैकी सहा विमानतळ आंतरराष्ट्रीय आहेत. या १३ विमानतळांवरून २०२४-२५ या वर्षात ३ लाख ८२ हजार देशांतर्गत उड्डाणे पार पडली आहेत. त्या आधीच्या वर्षी हे प्रमाण ३ लाख ६८ हजार होते. राज्याच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीपैकी सर्वाधिक वाटा मुंबई विमानतळाचा आहे. २०२४-२५मध्ये प्रवासी संख्येतही वाढ झाली असून, मालवाहतुकीचे प्रमाणही देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले आहे.
यासंदर्भात राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात माहिती समोर आली आहे. मुंबईतून २०२३-२४च्या तुलनेत २०२४-२५मध्ये विमानोड्डाणांची संख्या कमी झाली. मात्र, देशांतर्गत प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतून २०२४-२५मध्ये २ लाख ४० हजार विमानांची उड्डाणे झाली. राज्यातील देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या तुलनेत हे प्रमाण ६२ टक्के आहे. या आधीच्या वर्षी मुंबईतून २ लाख ४१ हजार ८१३ विमानांचे उड्डाण झाले होते. हे प्रमाण राज्याच्या देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या तुलनेत ६५.५६ टक्के होते. आकडेवारीसोबतच विमान उड्डाणांची टक्केवारीही घटलेली असली तरी प्रवासी संख्येत मात्र वाढ दिसत आहे. मुंबईतून २०२४-२५मध्ये ५ कोटी ४८ लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. २०२३-२४मध्ये ५ कोटी २४ लाख प्रवाशांनी मुंबईहून देशांतर्गत प्रवास केला होता.
मुंबईहून २०२३-२४च्या तुलनेत २०२४-२५मध्ये आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांची संख्या वाढली आहे. ही संख्या ८३ हजार १७३वरून ८९ हजार ७१२वर पोहोचली. या माध्यमातून २०२३-२४मध्ये १ कोटी ४३ लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला होता. २०२४-२५मध्ये १ कोटी ५५ लाख प्रवाशांनी मुंबईहून देशांतर्गत प्रवास केला. मुंबई विमानतळावरून झालेल्या मालवाहतुकीचे प्रमाणही गेल्या वर्षभरात वाढले आहे. राज्यातून २०२४-२५मध्ये एकूण २ लाख ८७ हजार मेट्रिक टन मालवाहतूक झाली असून, यामध्ये २ लाख ३५ हजार १४४ मेट्रिक टन देशांतर्गत मालवाहतूक मुंबईहून झाली आहे. आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्येही राज्यात मुंबईहून झालेल्या मालवाहतुकीचा वाटा मोठा आहे. राज्यातून ६ कोटी ५९ लाख मेट्रिक टन मालवाहतूक आंतरराष्ट्रीय पातळीवर २०२४-२५मध्ये झाली. यातील ६ कोटी ५४ लाख मेट्रिक टन मालवाहतूक मुंबईतून झाली.






