हवामान, पाण्याची मुबलकता आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या नाशिकमध्ये आता घर किंवा मालमत्ता घेण्याचे जळगावकरांचे स्वप्न साकार होणार आहे. ‘क्रेडाई नाशिक मेट्रो’तर्फे दि. ७ ते ९ मार्चदरम्यान जळगावात सागर पार्क येथे ‘ नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो ’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘क्रेडाई नाशिक मेट्रो’चे उपाध्यक्ष व एक्स्पो प्रमुख मनोज खिंवसरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या ‘एक्स्पो’साठी वातानुकुलित डोम उभारण्यात येणार आहेत. यात सुमारे २५ बांधकाम व्यावसायिकांचे २८ स्टॉल असतील. सकाळी १० ते रात्री ८ प्रवेश सर्वांसाठी खुला असेल.
नाशिकमध्येच गुंतवणूक का?
खिंवसरा म्हणाले की, ‘चेन्नई-सुरत महामार्ग आणि वाढवण बंदर विकासामुळे नाशिकचे महत्त्व वाढले आहे. विशेषतः समृद्धी महामार्ग आणि जळगावला जोडणाऱ्या ‘खान्देश एक्स्प्रेस वे’च्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिकमधील अंतर कमी होऊन कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार आहे. कुंभमेळ्यामुळे रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची खात्री आहे’.
या प्रदर्शनाचे प्रायोजक 'अर्बन स्टाईल्स' व सहप्रायोजक 'क्रिश ग्रुप' आहेत. प्रदर्शनाचा लेआउट आणि व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असून, ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार योग्य मालमत्ता निवडता येणार आहे. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोची मॅनेजिंग कमिटी व युवा विंगचे सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.







