भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीच्या चारकोप परिसरात घडली. अरफात अन्सारी असे त्याचे नाव असून, तो डिलिव्हरी बॉय असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा अरफात बुधवारी डिलिव्हरी पोहोचविण्यासाठी निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर भूमी मार्टजवळ भरधाव टँकरने अरफात याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत अरफात दुचाकीवरून फेकला गेला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निष्काळजीने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालक महेंद्र यादव याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.







