संशोधनातील गैरवर्तन, प्रकाशनाचा वाढता दबाव, तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेली नैतिक आव्हाने आणि संशोधनाचा समाजावर होणारा थेट परिणाम, यामुळे संशोधन व प्रकाशनातील नैतिकतेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अशा वेळी प्रत्येक संशोधकाने नैतिक मानकांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. संशोधनाचा परिणाम थेट समाजावर होत असल्याने संशोधनातील नैतिकता केवळ शैक्षणिक चौकटीपुरती मर्यादित न ठेवता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी परिसंवादात व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग; तसेच आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स - सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटेग्रेटिव्ह हेल्थ यांच्या वतीने ‘संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकतेपुढील आव्हाने’ या विषयावर विशेष परिसंवाद भूशास्त्र विभागाच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन होते. या परिसंवादात माजी कुलगुरू प्रा. पंडित विद्यासागर, प्रा. नितीन करमळकर, प्रा. श्रीधर गद्रे, प्रा. महेश देवकर, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी आणि प्रा. आनंद कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रा. शुभदा नगरकर लिखित ‘संशोधन आणि प्रकाशनातील नैतिकता ’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा. पटवर्धन यांनी पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर पब्लिकेशन एथिक्स हे भारतातील एकमेव केंद्र असल्याचे नमूद करून संशोधन व प्रकाशनातील नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक संशोधकाने आपल्या संशोधन प्रक्रियेत नैतिकतेचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यशास्त्र विभागाचे डॉ. गिरीश टिल्लू यांनी परिसंवादामागील उद्देश स्पष्ट केला. संशोधनातील नैतिकतेचे महत्त्व, बदलते तंत्रज्ञान आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने, यावर चर्चा घडवून आणणे हा परिसंवादाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. नगरकर यांनी पुस्तकामागील संकल्पना आणि लेखनप्रवास उलगडून सांगितला. डॉ. सुनेत्रा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन करत परिसंवादाचा गोषवारा मांडला, तर प्रा. भाऊसाहेब पानगे यांनी आभार मानले.






