‘आमच्यावर तुम्ही केलेले आरोप निराधार’

महाराष्ट्र टाइम्स

काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे आरोप फेटाळले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आले नाहीत कारण त्यांना विरोधकांना सामोरे जाण्याचे धाडस नव्हते, असे खासदारांनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली लोकसभाध्यक्ष काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्याची संधी नाकारणे अस्वीकार्य असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

‘आमच्यावर तुम्ही केलेले आरोप निराधार’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

काँग्रेसच्या महिला खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काही अघटित कृत्य केले जाण्याची माहिती मिळाल्याने माझ्या विनंतीवरून पंतप्रधान सभागृहात आले नाहीत, हा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचा आरोप किंवा दावा पूर्णपणे निराधार व चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभाध्यक्षांना सोमवारी लिहिलेल्या निषेध पत्रात म्हटले आहे. ‘काँग्रेसचा कोणताही खासदार हिंसाचारावर विश्वास ठेवत नाही,’ असे सांगतानाच, लोकसभाध्यक्ष सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत,’ असेही या पत्रात म्हटले आहे. ‘बिर्ला यांनी कनिष्ठ सभागृहाचे निष्पक्ष संरक्षक म्हणून काम करावे,’ अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या निषेधपत्रावर काँग्रेस च्या सरचिटणीस प्रियांका गांधी, वर्षा गायकवाड, ज्योती मणी यांच्यासह ११ महिला खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘आम्ही आपल्याला (बिर्ला) हे पत्र दुःखाने आणि घटनात्मक जबाबदारीच्या भावनेने लिहित आहोत. लोकसभेचे माननीय सभापती आणि या सभागृहाचे घटनेचे संरक्षक म्हणून तुम्हाला सत्ताधारी पक्षाने विरोधी महिला खासदारांवर, विशेषतः काँग्रेस खासदारांवर खोटे, निराधार आणि बदनामीकारक आरोप करण्यास भाग पाडले आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनविरोधी सरकारविरुद्ध आम्ही सातत्याने आवाज उठवला आहे आणि त्यांच्याकडून जबाबदारीची मागणी केली आहे म्हणूनच आम्हाला लक्ष्य केले जात आहे,’ असे या पत्रात म्हटले आहे.

‘पंतप्रधानांची अनुपस्थिती कोणत्याही भीतीमुळे नव्हती; तर केवळ विरोधकांना तोंड देण्याचे धाडस नसल्याने मोदी सभागृहात आले नाहीत. संसदेची प्रतिष्ठा राखणे, निष्पक्षता सुनिश्चित करणे आणि पक्षाशी संलग्नता न ठेवता सर्व सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करणे ही सभापती कार्यालयाची जबाबदारी आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान स्थापित संसदीय परंपरा अशी आहे की सत्ताधारी पक्षाला आणि नंतर विरोधी पक्षाला बोलण्याची संधी दिली जाते, त्यानंतर पंतप्रधान उत्तर देतात. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गेल्या आठवड्यात सलग चार दिवस लोकसभेत बोलण्याची संधी जाणूनबुजून नाकारण्यात आली, जी पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे,’ असेही पत्रात म्हटले आहे.