लष्कराकडून नेपाळला वाहने भेट

महाराष्ट्र टाइम्स

भारतीय लष्कराने नेपाळला ५० वाहने भेट दिली. पाटणा आणि चंदीगडमध्ये न्यायालयांना बॉम्बची धमकी मिळाली. सोनम वांगचुक यांची प्रकृती ठीक असून त्यांना तुरुंगात चांगले उपचार मिळाले. हाँगकाँगमध्ये जिमी लाई यांना २० वर्षांची शिक्षा झाली. तेलंगणात फोन टॅपिंगद्वारे खंडणीचा आरोप झाला. कानपूरमध्ये रेल्वेवर दगडफेक झाली.

लष्कराकडून नेपाळला वाहने भेट
भारतीय लष्कराने नेपाळला ५० लष्करी वाहने भेट दिली आहेत. काठमांडूमध्ये एका कार्यक्रमात ही वाहने सुपूर्द करण्यात आली. दरम्यान, बिहार आणि चंदीगडमधील न्यायालयांना बॉम्बची धमकी मिळाली, ज्यामुळे कामकाज थांबवावे लागले. दुसरीकडे, पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली की ते पूर्णपणे बरे आहेत आणि त्यांना तुरुंगात चांगले उपचार मिळाले. हाँगकाँगमध्ये माध्यमकर्मी जिमी लाई यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी बीआरएस सरकारच्या काळात फोन टॅपिंगद्वारे खंडणी उकळल्याचा आरोप केला आहे. कानपूरमध्ये काशी-महाकाल एक्स्प्रेसवर दगडफेक झाली, ज्यात एका डब्याची काच फुटली.

भारतीय लष्कराने आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाहने भेट दिल्याची माहिती दिली. यासोबतच वाहने देतानाचे काही फोटोही शेअर केले आहेत. काठमांडू येथे आयोजित एका समारंभात, नेपाळमधील भारतीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही वाहने अधिकृतपणे नेपाळी सैन्याला देण्यात आली.
बिहारमधील पाटणा येथे दोन न्यायालयांना ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी परिसराची कसून झडती घेतली. महिनाभरात दुसऱ्यांदा अशा प्रकारची धमकी मिळाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून न्यायालयीन कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. यामुळे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या जामीन अर्जावरही स्थगिती आली होती.

चंदीगडमधील पंचकुला येथील न्यायालयालाही सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर पोलिसांनी तातडीने न्यायालयाचा परिसर रिकामा केला आणि शोधमोहीम सुरू केली. बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वानदळ आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता. मात्र, तपासणीत काहीही संशयास्पद आढळून आले नाही. गेल्या महिन्यात अंबाला येथील काही शाळांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या.

पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली. सरकारने सांगितले की, ‘सोनम वांगचुक यांची प्रकृती पूर्णपणे बरी असून, तुरुंगात असताना त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार करण्यात आले.’ वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) अटक करण्यात आली असून, ते जोधपूर येथील केंद्रीय तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील या कारवाईला त्यांची पत्नी गीतांजली आंग्मो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हाँगकाँगमध्ये प्रसिद्ध माध्यमकर्मी आणि चीनचे टीकाकार जिमी लाई (वय ७८) यांना वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत चीनने आतापर्यंत दिलेली ही सर्वात मोठी शिक्षा आहे. परदेशी शक्तींशी हातमिळवणी करून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणण्याचा आणि देशद्रोह होईल असे लेख प्रकाशित करण्याचा कट रचल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) काळात फोन टॅपिंगद्वारे राज्यातील व्यावसायिकांना ब्लॅकमेल करून, शेकडो कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप केला आहे. ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील चेलपूर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

कानपूर येथील भीमसेन रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तींनी काशी-महाकाल एक्स्प्रेसवर दगडफेक केली. या घटनेत फर्स्ट एसी डब्याची एक काच फुटली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली. विंदपुरी स्थानक सोडल्यानंतर काही वेळातच हा हल्ला झाला.