शरद पवार यांची प्रकृती स्थिर

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना खोकला आणि कफामुळे रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले आहे. प्राथमिक तपासण्यांमध्ये त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांतील धावपळीमुळे थकवा जाणवत असल्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शरद पवार यांची प्रकृती स्थिर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांना खोकला आणि कफ झाल्याने सोमवारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासण्या सामान्य असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेली धावपळ, थकवा यामुळे त्रास झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात पवार यांची भेट घेतली.

शरद पवार बारामती येथे असताना सोमवारी त्यांना घसा दुखणे आणि कफ असल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तातडीने त्यांना रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. छातीत कफ असल्याने पुढील पाच दिवस त्यांना ‘अँटिबायोटिक्स’द्वारे उपचार देण्यात येणार आहेत. फिजिशियन डॉ. अभिजित लोढा आणि अन्य डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

डॉ. लोढा म्हणाले, ‘शरद पवार यांना दोन-तीन दिवसांपासून कफचा त्रास जाणवत होता. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या हृदयाचे ठोके, ऑक्सिजनची पातळी, रक्तदाब सामान्य आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांतील सततचा प्रवास आणि कार्यक्रमांमुळे त्यांना थकवा आला आहे. छातीत थोडा कफ असल्याने श्वसनसंस्थेचीही तपासणी केली आहे. सद्यस्थितीत त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा अतिदक्षता विभागाची आवश्यकता नाही.’

कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये, असे आवाहन पवार कुटुंबीयांतर्फे करण्यात आले. पवार यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते.