‘यशस्वी होऊ की नाही, हा प्रश्न प्रत्येक तरुणाच्या मनात असतो. मात्र, स्वतःवरचा विश्वास, सातत्यपूर्ण मेहनत आणि कामातील उत्कृष्टता यामुळेच यशाचे टप्पे गाठता येतात,’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण समारंभात लळीत बोलत होते. माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, ‘एमआयटी’चे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, मुख्य विकास अधिकारी सिद्धान्त चोरडिया आदी उपस्थित होते.
लळित म्हणाले, ‘महाराष्ट्राशी जवळचा संबंध आहे. माझी कर्मभूमी दिल्ली आणि सर्वोच्च न्यायालय आहे. वकिली केल्यानंत सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.’
डॉ. चोरडिया म्हणाले, ‘सूर्यदत्त शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर दिला आहे. चांगला नागरिक घडवण्यासाठी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्वांना विद्यार्थ्यांसमोर आणले जाते.’
या समारंभात पद्मश्री परमपूज्य आचार्य डॉ. चंदनाजी महाराज यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी ॲवॉर्ड’, तर लळित यांच्यासह सराफ, हास्ययोग चळवळीचे विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सेहगल, शिक्षणतज्ज्ञ अशोककुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. आनंद भाडळकर, ॲड. प्रमोद आडकर, प्रा. सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी, जागतिक रणनीतीकार संजय पुरी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
‘वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींना समोर आणून सन्मानित करण्याचा चोरडिया दाम्पत्याचा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे. माझ्या प्रवासात निवेदिताची मोलाची साथ लाभली. चांगले झाले तर कौतुक आणि काही चुकले तर स्पष्टपणे सांगणाऱ्या निवेदिता आणि माझ्या सहवासाची ३७ वर्षे झाली. सभागृहात उपस्थित प्रत्येकाची साथ मला लाभली. तुम्हा प्रेक्षकांच्या पावतीमुळेच काम करताना हुरूप येतो आणि आणखी जोमाने काम करता येते,’ असे अशोक सराफ यांनी सांगितले.






