फरार सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

महाराष्ट्र टाइम्स

नाशिकरोड पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगाराला पकडले. सातपूर परिसरात जलकुंभांची सुरक्षा धोक्यात आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले असून १९ फेब्रुवारीला उत्सव साजरा होईल. एमआयडीसीतील रस्त्यांचे रुंदीकरण रखडले आहे. पाथर्डी परिसरातील नागरिकांनी धोकादायक फीडर्स बदलण्याची मागणी केली आहे.

फरार सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात
नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगार पीयूष नितीन दोंदे याला अटक केली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोंदेला गोरेवाडी रेल्वे फटकाजवळ पकडण्यात आले. या कारवाईमुळे नाशिकरोड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

नाशिकरोड पोलिसांनी पीयूष नितीन दोंदे (वय २१, रा. गोरेवाडी, शास्त्रीनगर, जेलरोड) याला अटक केली आहे. त्याच्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्यात आर्म ॲक्ट आणि दरोड्याचा गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देत होता. मात्र, गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याला पकडण्यात आले. पोलिस शिपाई अरुण गाडेकर आणि महेंद्र जाधव यांना पीयूष दोंदे गोरेवाडी रेल्वे फटकाजवळ येणार असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.
सातपूर विभागातील जलकुंभांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा वावर वाढला आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहतीतील जलकुंभाच्या ठिकाणी बसण्यासाठी आसनव्यवस्था आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात मद्यपान करणारे बसत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. सातपूर कॉलनीतील जलकुंभ आवारातही अशीच परिस्थिती आहे. नागरिकांनी मद्यपींवर आळा घालण्याची मागणी केली आहे.

सातपूरमध्ये 'एक गाव एक शिवजन्मोत्सव' ही सामाजिक एकतेची परंपरा जपली जात आहे. या परंपरेनुसार, सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन अशोकनगर–सावरकरनगर येथील जानता राजा मैदानात उत्साहात पार पडले. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि कार्याध्यक्ष नगरसेविका अंकिता शिंदे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. येत्या १९ फेब्रुवारी रोजी परिसरात एकच शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात समाजातील सर्व घटकांनी उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले आहे.

सातपूर आणि अंबड एमआयडीसीतील रस्त्यांच्या साइडपट्ट्यांवर काही कारखान्यांनी सिमेंटचे रॅम्प टाकले आहेत. मात्र, रस्त्यांचे रुंदीकरण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अरुंद रस्त्यांवरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते. एमआयडीसीच्या संबंधित विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी साइडपट्ट्यांवर केलेली अतिक्रमणे काढून टाकावी, अशी मागणी अवजड वाहनचालकांनी केली आहे.

पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगर, नरहरीनगर, कडवेनगर भागातील महावितरण कंपनीचे धोकादायक फिडर बॉक्स तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. महावितरणच्या पाथर्डी येथील उपविभागीय कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण जाधव यांना निवेदन देण्यात आले. महावितरणने सर्व फिडर्स सुरक्षित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.