मुख्यमंत्र्यांची वॉर रूम, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने घेतलेला आढावा, विधिमंडळात आमदारांच्या ‘लक्षवेधी’वर मंत्र्यांनी दिलेले उत्तर, अशा सर्व लोकशाही साधनांचा वापर करूनही शिवाजीनगरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पदरी पडणारी निराशा केवळ अन्यायकारक नसून, चीड आणणारी आहे. ‘लालपरी’ असे दिमाखाने मिरविणाऱ्या एसटी महामंडळाचा कारभार लालफितीमध्येच अडकलेला असून, या प्रश्नावर तोडगा काढण्यात मेट्रो प्रशासनही कमी पडल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाला अभिमानाने मिरवायचे असेल, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या बैठकांमध्ये ठरलेल्या इतिवृत्ताशिवायच्या अटी-शर्ती वगळून हा करार तातडीने करण्यासाठी पावले उचलायला हवीत. ‘महामेट्रो’ ही राज्य सरकारच्या मालकीची कंपनी असून, शिवाजीनगर स्थानक विकसित करण्यासाठी त्यांनी तयारी दाखवली म्हणून त्यांच्याकडून आणखी एक स्थानक उभारण्याचा दुराग्रह हा केवळ काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच आहे. त्यामुळे पुण्याचे जागरूक लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री-पालकमंत्री यांना तातडीने यात लक्ष घालायला लावून हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी हा करार अस्तित्वात आणतील, अशीच पुणेकरांची अपेक्षा आहे.
शिवाजीनगर येथील प्रस्तावित बस स्थानकाचा आराखडा कोणी करायचा, बांधकाम कोणी करायचे आणि तेथे कोणत्या सुविधा निर्माण केल्या जाणार, यावर अनेक बैठकांमध्ये चर्चा होऊनही प्रत्यक्ष करारादरम्यान वेगळ्याच अटी-शर्ती पुढे केल्या जात असल्याने स्थानकाच्या पुनर्विकासाला खो मिळत आहे. एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) ताठर भूमिकांचा फटका खान्देश, मराठवाडा व राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जाणाऱ्या हजारो प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. दुर्दैवाने, पुण्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्षच केले असून, आता नव्या पालकमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनी लक्ष घातले, तरच हा तिढा सुटेल अशी शक्यता आहे.
शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकासाठी डिसेंबर २०१९ मध्ये येथील एसटी स्थानक वाकडेवाडीला हलविण्यात आले. सुरुवातीला तीन वर्षे आणि त्यानंतर आणखी मुदतवाढ मिळूनही अद्याप या स्थानकासाठी एकही वीट रचलेली नाही. मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या बैठकांमध्ये दोन्ही संस्थांचे अधिकारी लवकरच करार करण्यात येईल, असे आश्वासन देत असले, तरी प्रत्यक्ष करारात काही वेगळ्याच अटी-शर्तींचा अंतर्भाव करीत असल्याने त्याला मूर्त स्वरूप येत नाही,
एसटी ला गांभीर्य नाही?
शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या कामाबाबत पुण्यातील एकाही अधिकाऱ्याला काहीही माहिती नाही. या संदर्भातील सर्व कामकाज मुख्यालयातून चालते, असे सांगितले जाते. एसटीचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांच्याकडे विचारणा करण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना मोबाइलवरून संदेशालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे एसटी प्रशासनच शिवाजीनगर स्थानकाबाबत गंभीर आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.






