राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील आपल्या भाषणातील काही भाग हटवल्याबद्दल विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली व हटवलेल्या भागांत असंसदीय असे काहीही नसल्याने ते पुन्हा संसदीय नोंदींमध्ये समाविष्ट करण्याची आग्रही मागणी केली. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ झाला. त्यावर सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी, आपण तो निर्णय राज्यसभेच्या नियमांनुसार घेतला होता व सभापतींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येत नाही, याची जाणीव खर्गे यांना सौम्यपणे करून दिली.
शून्य प्रहराचे संपल्यानंतर खर्गे यांनी ही मागणी केली. ‘राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेच्या सुरुवातीलाच मी सांगितले होते, की यंदाचे अभिभाषण हे राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्याची एक उत्तम संधी होती; परंतु हे अभिभाषण प्रतिबिंबित करत नाही. म्हणूनच मी माझे विचार विस्तृतपणे मांडले. मात्र, राज्यसभेच्या संकेतस्थळावर माझ्या भाषणाचा मोठा भाग कोणत्याही कारणाशिवाय हटवण्यात आला आहे. माझ्या भाषणातील हटवलेले भाग सभागृहाच्या कामकाजात पुन्हा समाविष्ट केले पाहिजेत,’ अशीही मागणी खर्गे यांनी केली.
‘ राज्यसभा नियमावलीच्या नियम २६१ अंतर्गत, एखाद्या सदस्याच्या भाषणातील शब्द असंसदीय असतील, तर ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले पाहिजेत,’ असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. काँग्रेसच्या सदस्यांनी याचा निषेध केला.






