हिवरा साबळेत पाणीप्रश्न गंभीर

महाराष्ट्र टाइम्स

मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे गावात पाझर तलावातील दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना त्वचारोग आणि इतर आजार झाले आहेत. यामुळे पाणीपुरवठा बंद झाला असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. महिलांना दोन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. जुन्या योजनेतील विहिरीतून पाणी पुरवठ्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य पथकांनी दूषित पाणीपुरवठा थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

हिवरा साबळेत पाणीप्रश्न गंभीर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे येथे पाझर तलावातील दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने ग्रामस्थांना त्वचारोगासह विविध आजार जडले. त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद झाला. आता पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दोन-दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी महिलांची पायपीट सुरू झाली आहे. ‘मटा’ने हा विषय लावून धरला आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने जुन्या योजनेच्या विहिरीवरून गावात पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यामध्ये बराच वेळ जाणार असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. डोक्यावर दोन-दोन हंड्यांद्वारे महिला शेतातील विहिरींवरून पाणी आणतानाचे चित्र दिसत आहे. ग्रामपंचायतीने तलावातील पाण्याचा फिल्टर न करताच गावात पुरवठा केला. यामुळे अंगावर गुथी येणे, खाज येणे, ताप येणे अशा व्याधी सुरू झाल्या. सद्यस्थितीत पिण्यासाठी गाव परिसरात पाणी उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शेतातील विहिरीवरच उपलब्ध आहेत. पंचवीस वर्षांपूर्वीच्या नळ योजनेसाठी विहीर बांधण्यात आली होती. तेथून पाणी आणण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

आरोग्य पथकांनी १० फेब्रुवारीला तपासणी केल्यानंतर दूषित पाण्याचा पुरवठा बंद करण्यास सांगण्यात आला. असेच दूषित पाणी पित राहिल्यास या गावात जलजन्य आजारांचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा वैद्यकीय पथकांनी दिला आहे.