पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नव्या पंतप्रधान कार्यालयाचे म्हणजे ‘सेवा तीर्थ’ या नव्या प्रशासकीय संकुलाचे उद्घाटन केले. या कार्यालयातून कामाचा श्रीगणेशा करताना मोदी यांनी चार महत्त्वपूर्ण निर्णयांवर स्वाक्षरी केली. यामध्ये रस्ते अपघातांतील जखमींना वेळीच उपचार मिळावेत, यासाठी १.५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचारांचा दिलासा देणारी पंतप्रधान दिलासा योजना मंजूर करण्यात आली आहे.
सरकारने एक वर्ष आधीच ‘लखपती दीदी’चे ३ कोटी हे लक्ष्य गाठले आहे. आता पंतप्रधानांनी मार्च २०२९पर्यंत हा आकडा ६ कोटींपर्यंत वाढवण्याचे नवीन लक्ष्य ठेवले आहे. हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी, ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ २ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे कृषी मूल्य साखळी मजबूत होण्यास आणि शेतकऱ्यांना चांगल्या साठवणूक आणि प्रक्रिया सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल. नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी, ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.०’ला १०,००० कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली. डीप टेक, प्रगत उत्पादन आणि सुरुवातीच्या टप्प्यातील नवोपक्रमांना आर्थिक साह्य करणे, हा त्याचा उद्देश आहे.
देशाच्या इतिहासातील एका ऐतिहासिक बदलाचे प्रतीक असलेल्या ‘सेवा तीर्थ’ या अत्याधुनिक इमारतीत पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस) आणि मंत्रिमंडळ सचिवालय आहे. पंतप्रधानांनी सर्वप्रथम गणेशपूजन व ‘सेवा तीर्था’च्या फलकाचे अनावरण करून या वास्तूत कामकाजाला प्रारंभ केला व काही फाइलींवर स्वाक्षऱ्या केल्या. या संकुलाच्या भिंतीवरील ताम्रपट्टिकेवर देवनागरी लिपीत ‘सेवा तीर्थ’ हे नाव व त्याखाली ‘नागरिक देवो भव’ असे ब्रीदवाक्य कोरलेले आहे.
उद्घाटनप्रसंगी ‘पीएमओ’चे राज्यमंत्री जितेंद्रसिंह, गृहनिर्माण आणि नगरविकासमंत्री मनोहरलाल खट्टर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आदी उपस्थित होते.






