संयुक्त राष्ट्र (यूएन) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या दीडे ते दोन दशकांत कर्करोगाचे ७५ टक्के रुग्ण वाढले आहेत. यासोबतच महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. कर्करुग्णांच्या वाढत्या आलेखामुळे परिस्थिती गंभीर बनली असून लवकर निदान , प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य केल्यास रुग्ण दगावण्याचा दर कमी करता येऊ शकतो’, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटमध्ये (एनसीआय) पहिल्यांदाच ‘ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स’ या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर एनसीआयचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, महासचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, एनसीआयचे ग्लोबल ऑपरेशन्स अँड स्ट्रॅटेजी डायरेक्टर शशी मंदापती आदींची उपस्थिती होती.
यावेळी एनसीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ गयाना यांच्यात संशोधन सहकार्य व सर्वांसाठी परवडणाऱ्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एनसीआयचे प्रगतिपुस्तक ‘विंग्स’चे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘कर्करोगाचे लवकर निदान होणे हेच त्यावर एकमेव प्रभावी शस्त्र आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानाचा खूप विकास झाला आहे. परंतु, रुग्ण शेवटच्या टप्प्यात आल्यावर त्या तंत्रज्ञानाचा काही फायदा होऊ शकत नाही. राज्य सरकारने ‘महा कॅन्सर केअर फाउंडेशन’ ही कंपनी स्थापन केली असून ‘हब अँड स्पोक’ मॉडेलवर आधारित काम करण्यात येणार आहे.’ प्रास्ताविक शैलेश जोगळेकर, संचालन व आभारप्रदर्शन करिश्मा तिवारी यांनी केले.
‘मेडटेक, बायोटेक आणि ए-आय आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवत घडवून आणू शकते. त्यामुळे त्याचा अचूक वापर व्हायला हवा. तेव्हा, कर्करोगासारख्या भयंकर रोगाचे लवकर निदान आणि परवडणारे उपचार बाबींवर भर देत राज्य सरकार लवकरच राज्यात ‘कॅन्सर केअर ग्रीड’ सेंटर उभारण्याच्या दिशेने पावले उचलत आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.





