‘पोहरादेवी हे केवळ धार्मिक स्थळ नसून, पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी क्षमता असलेले केंद्र आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आवश्यक पायाभूत सुविधा , रस्ते, निवास व पर्यटक सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. पोहरादेवीसारख्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. विकास आणि सामाजिक समरसतेसाठी शासन कटिबद्ध असून पोहरादेवी येथे उद्योग निर्मितीला चालना देण्यात येईल’, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आयोजित ‘श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवा’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संत सेवालाल महाराज यांचे विचार समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव रुजवणारे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या उद्घाटन सोहळ्याला मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज, आमदार किरण सरनाईक, आमदार सई डाहाके, आमदार राजेश राठोड, आमदार किसन वानखडे, पुसदच्या नगराध्यक्ष मोहिनी नाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड आदी उपस्थित होते.
‘संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवामुळे पोहरादेवीचा नावलौकिक वाढत आहे. अशा उपक्रमांतून युवा पिढीला संस्कृतीची ओळख होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ या भागातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील’, असे राज्यमंत्री नाईक म्हणाले. पोहरादेवीला जोडणारी विकासकामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविकात राठोड यांनी पर्यटन महोत्सवासंदर्भात माहिती दिली.





