विलेपार्ले येथे बारा कोटींचे ड्रग्ज जप्त

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विलेपार्ले येथे मोठी कारवाई केली. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एका खासगी बसमधून बारा कोटी रुपयांचे एमडी आणि कोकेन जप्त करण्यात आले. या प्रकरणी अक्षय कांडियली नावाच्या २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे साडेतीन किलो एमडी आणि पाचशे ग्रॅम कोकेन सापडले. या ड्रग्जची किंमत सुमारे बारा कोटी रुपये आहे.

विलेपार्ले येथे बारा कोटींचे ड्रग्ज जप्त
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोठी ड्रग्ज तस्करी उघडकीस आणली आहे. दिल्लीहून मुंबई करीत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसमधून पोलिसांनी बारा कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा पकडला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट नऊच्या पथकाने अक्षय कांडियली (२१) या तरुणाला अटक केली. त्याच्याकडे सापडलेल्या ड्रग्जमध्ये एमडी आणि कोकेन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुण्याकडे मुंबईमार्गे जाणाऱ्या एका खासगी बसमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्जची वाहतूक केली जात असल्याची माहिती युनिट नऊच्या पथकाला मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने या बसबाबत अधिक माहिती मिळवली. ही बस मुंबईत विलेपार्ले येथे काही वेळ थांबणार असल्याचे कळाले. पोलिसांच्या पथकाने पंचांसमवेत विलेपार्ले परिसरात सापळा रचला. बस या ठिकाणी येताच आतमध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाची चौकशी करण्यात आली. तपासणी दरम्यान अक्षय अशोकन कांडियली याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची कसून झडती घेण्यात आली. झडतीमध्ये त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले.

मूळचा केरळचा असलेल्या अक्षयकडे सुमारे साडेतीन किलो एमडी आणि पाचशे ग्रॅम कोकेन सापडले. सुमारे चार किलोच्या ड्रग्जची किंमत सुमारे बारा कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून अक्षय याला अटक करण्यात आली आहे. अक्षय याने इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कुठून आणले आणि कुणाला देणार होता, याबाबत तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.