The Amusing Story Of The Gas Cylinder Protest In Parliament
गॅस सिलिंडरचेही वृत्त छापा !
महाराष्ट्र टाइम्स•
संसदेबाहेर गॅस सिलिंडरच्या प्रतिकृती घेऊन आंदोलन सुरू आहे. खासदार रोज सकाळी हे आंदोलन करतात. सोमवारी एका वाहनामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. एका प्रवेशद्वारावरील सायरन अचानक वाजल्याने गोंधळ उडाला. मात्र, वाऱ्यामुळे बॅरियर हलल्याने हा प्रकार घडला होता. भाजप खासदार मेधा कुलकर्णी, कंगना रनौत आणि निशिकांत दुबे यांनी आंदोलनकर्त्यासोबत फोटो काढले.
नवी दिल्ली: संसदेच्या मकरद्वारात गॅस सिलिंडरच्या प्रतिकृती घेऊन आंदोलन करणाऱ्या प्रशांत पडोळे यांनी सोमवारी सपा नेते अखिलेश यादव यांचे लक्ष वेधून घेतले. यादव यांनी पडोळे यांच्याजवळील गॅस सिलिंडरची प्रतिकृती उचलून ‘ये भी छापोगे क्या? दिखाओगे क्या’ असे विचारले आणि पत्रकारांवर आंदोलनाची दखल न घेतल्याचा आरोप केला. याच दिवशी, संसदेच्या प्रवेशद्वारावर सायरन वाजल्याने सुरक्षा यंत्रणेत काही काळ धावपळ उडाली, जी वाऱ्यामुळे बूम बॅरियर्स हलल्याने आपोआप वाजली होती. मंगळवारी, भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रशांत पडोळे यांना फोटो काढताना सिलिंडर बाजूला घेण्यास सांगितले, पण अखेरीस तिघेही एकाच फोटोत आले.
प्रशांत पडोळे रोज सकाळी संसदेच्या मकरद्वारात गॅस सिलिंडरच्या प्रतिकृती घेऊन आंदोलन करतात. गर्दी ओसरल्यावर ते दिवसभर एकटेच मोर्चा सांभाळतात. संसदेत येणारे-जाणारे खासदार त्यांच्या हातातील मराठी फलकांचा अर्थ विचारतात आणि पडोळे त्यांना त्यांच्या वैदर्भीय हिंदीत समजावून सांगतात. सोमवारी सपा नेते अखिलेश यादव यांचेही लक्ष या फलकांनी वेधले. त्यांनी पडोळे यांच्याजवळील गॅस सिलिंडरची प्रतिकृती उचलून पत्रकारांना विचारले, ‘ये भी छापोगे क्या? दिखाओगे क्या’. ते पुढे म्हणाले की, तुम्ही फक्त फोटो काढल्याचे दाखवता. दुसऱ्या दिवशी आमच्या (विरोधकांच्या) आंदोलनाची ओळही छापून येत नाही.दिल्लीत सोमवारी गार वाऱ्याच्या वातावरणात एका अनपेक्षित कारणामुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ झाली. संसदेच्या प्रवेशद्वारांवर लोखंडी अडथळे (बूम बॅरियर्स) आहेत. दुपारी १२च्या सुमारास एका प्रवेशद्वारावरील धोक्याची सूचना देणारा सायरन अचानक वाजला. यामुळे परिसरातील अधिकारी एका प्रवेशद्वाराकडे धावले. संसदीय पास नसलेले एक वाहन संसद परिसरात घुसल्याचा इशारा देणारा हा सायरन अचानक वाजला होता. निमलष्करी दलांची अभेद्य सुरक्षा भेदून पास नसलेले वाहन संसदेच्या आवारात कसे पोहोचले, अशी विचारणा सुरू झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच ती गाडी थांबवली. मात्र, काळजी करण्यासारखे काहीही नव्हते. या वाहनाने संसद परिसरात प्रवेश केल्यानंतर बूम बॅरियर्स सक्रिय झाले. त्याच वेळी जोरदार वाऱ्यामुळे हे लोखंडी बॅरियर्स हलले आणि सायरन आपोआप वाजला.
वारियाने ‘बॅरियर’ हाले... या गौळणीच्या धर्तीवर ‘वारियाने बॅरियर हाले’ असे होणे स्वाभाविक होते. पण अदृश्य वाऱ्याची ही ‘किमया’ कडक शिस्तीतल्या दक्ष सुरक्षा यंत्रणेला लगेच कशी कळणार? यातून काही काळ सुरक्षा यंत्रणेची धावपळ झाली. हा गमतीशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.
मंगळवारी दुपारी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी पुण्यातून आलेल्या काही पाहुण्यांसह मकरद्वारात आल्या होत्या. तेवढ्यात कंगना रनौत व निशिकांत दुबे हेही तिथे आले. कुलकर्णी यांच्या पाहुण्यांनी त्या दोघांबरोबर छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. पण शेजारीच उभे असलेले प्रशांत पडोळे गॅस सिलिंडरसह फोटोत येत असल्याचे पाहून कुलकर्णी तावातावाने त्यांच्या दिशेने वळल्या. त्यांनी पडोळे यांना सांगितले की, येथे आंदोलनाचा तुम्हाला अधिकार आहे तसा छायाचित्र काढण्याचा आम्हालाही अधिकार आहे. तेव्हा तुमचे हे सिलिंडर बाजूला घ्या. इतक्यात पडोळे फलक घेऊन उभेच राहिले. परिणामी, कुलकर्णी, रनौत व दुबे या भाजप नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे आंदोलनकर्ते पडोळे उभे असल्याचा गमतीशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.