निलंबनास्त्र आज घेणार मागे

महाराष्ट्र टाइम्स

लोकसभेत शिस्तभंग करणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन आज मागे घेतले जाणार आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या बैठकीत यावर एकमत झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलेल्या या खासदारांना आता सभागृहात पुन्हा सहभागी होण्याची संधी मिळेल. पक्षांकडून त्यांना शिस्त पाळण्याचे निर्देश दिले जातील. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर खासदार कामकाजात भाग घेतील.

congress eight mps suspension cancelled today

लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल निलंबित केलेले काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यासह आठ खासदारांचे निलंबन आज, मंगळवारी रद्द केले जाणार असून लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत या मुद्द्यावर एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल आणि पीठासीन अधिकाऱ्यांवर कागदपत्रे फेकल्याबद्दल काँग्रेसचे सात आणि माकपचे एक अशा आठ खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते.

या आठही खासदारांवरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यासाठी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर एक प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी बिर्ला यांच्या दालनात झालेल्या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. कनिष्ठ सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी निलंबन मागे घेण्यात यावे यावर या बैठकीत एकमत झाले. निलंबित खासदारांना त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून सभागृहात शिष्टाचार राखण्याचे आणि कोणत्याही आक्षेपार्ह किंवा अनुचित भाषेचा वापर न करण्याचे सक्त निर्देश देण्यात येतील असा निर्णयही घेण्यात आला. या आठही जणांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव विरोधकांकडून मांडला जाऊ शकतो. सभागृहाच्या सर्वसंमतीने त्यावर निर्णय घेतला जाईल. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर हे आठही खासदार मंगळवारपासून पुन्हा सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतील.