केंद्रीय मंत्रालयाच्या नावे गंडा

महाराष्ट्र टाइम्स

केंद्र सरकारच्या विभागात नोकरी आणि पेट्रोल पंप, गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला २ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. रामचंन्द्र मेहपत पाटील, देवेंद्र भार्गव, शिवम संतोषकुमार सेन आणि योगेश मिश्रा या चार जणांविरुद्ध बेलतरोडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराने मुला-मुलीच्या नोकरीसाठी आणि नातेवाईकांनी एजन्सीसाठी पैसे दिले होते.

केंद्रीय मंत्रालयाच्या नावे गंडा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

केंद्र सरकारच्या विभागात नोकरी, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवून २ कोटी रुपयांनी गंडा घालण्यात आला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी चार ठकबाजांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

रामचंद्र मेहपत पाटील (वय ३६, रा. मुलताई, जि. बैतुल), देवेंद्र भार्गव (वय ५५, रा. ग्वाल्हेर), शिवम संतोषकुमार सेन (वय ३५, रा. सागर) व योगेश मिश्रा (वय ६१, रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठकबाजांची नावे आहेत. नामदेव विश्वनाथ कडू (वय ६४, रा. उज्ज्वल सोसायटी, नरेंद्रनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नामदेव कडू यांची शेजाऱ्याच्या मार्फत पाटील याच्यासोबत ओळख झाली. ‘मी केंद्रीय मंत्रालयातील पीएचा साहाय्यक आहे’, असे पाटील याने नामदेव कडू यांना सांगितले. त्यानंतर त्याने भार्गव हा केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगितले. ‘भार्गव हा केंद्रीय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रेल्वे, प्राप्तिकर, पुरातत्त्व विभाग, नीती आयोग, एफसीआय आदींमध्ये नोकरी लावून देतो. यासह अन्य जण गॅस एजन्सी, वेअर हाउस व पेट्रोलपंप मिळवून देतो’, असे पाटील याने कडू यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. कडू यांनी मुलगा व मुलीला नोकरी लावून देण्यासाठी पाटील व त्याच्या साथीदारांना वेळोवेळी ७५ लाख रुपये दिले. तसेच त्यांच्या नातेवाइकांनीही ठकबाजांना पैसे दिले. त्यांनी पाटील व त्याच्या साथीदारांना १ कोटी ९४ लाख ७४ हजार ६०० रुपये दिले. पैसे घेतल्यानंतरही पाटील व त्याच्या साथीदारांनी नोकरी लावून दिली नाही. एजन्सीही मिळवून दिली नाही व पैसेही हडपले. फसवणूक झाल्याने कडू यांनी बेलतरोडी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.