जळगावात अठरा दुचाकींना अाग

महाराष्ट्र टाइम्स

जळगाव शहरात एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तब्बल १८ दुचाकींना आग लागली. या आगीत अनेकांचे मोठे नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली.

जळगावात अठरा दुचाकींना अाग
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

या आगीत अपार्टमेंटमधील रहिवासी आत्माराम जाधव, शिरीष सोनवणे, अजय कापुरे, सुरेश सोनवणे, शरद बोरसे, ललित वेडीस, ज्योती पवार, राजेश खिडके, भारत तामनेरकर, किरण पाटील, सुधीर पाटील, मनोज मोरे, धोंडू बडगुजर यांची प्रत्येकी एक दुचाकी. सागर पाटील व संग्राम विसपुते यांच्या प्रत्येकी दोन दुचाकी जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शहरात मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनीमध्ये शनिवारी (दि. १४) एका भीषण आगीच्या घटनेने खळबळ उडाली. ‘ साई गजानन रेसिडेन्सी ’ या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तब्बल १८ दुचाकी एकाच वेळी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, ही आग लागली की, एखाद्या माथेफिरूने ती लावली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

साई गजानन रेसिडेन्सीमधील रहिवाशांनी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकी अपार्टमेंटच्या खाली पार्क केल्या होत्या. शनिवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक या वाहनांनी पेट घेतला. पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या एका रहिवाशाला जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याने तातडीने आरडाओरडा करून इतर रहिवाशांना सावध केले.

रहिवाशांनी तातडीने पाण्याची मोटार लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु काही दुचाकींच्या पेट्रोल टाक्यांचे स्फोट झाल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. यामुळे पाणी मारणेही कठीण झाले होते. घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

माथेफिरूचा संशय आणि पोलिसांची कारवाई

एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांना आग लागल्याने, हे कृत्य एखाद्या माथेफिरूने केले असावे, असा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे देविदास सुरवाडे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.