‘सगळे धर्म सारखे आहेत, असे सांगणारे लोक तद्दन खोटारडे आहेत. जेव्हा एखादा समाज खोटे बोलायला लागतो तेव्हा त्या समाजाची मरण्याची लक्षणे दिसायला लागतात. सनातन हा एकच खरा धर्म आहे. काही राजकीय लोक स्वार्थासाठी धर्माचा उपयोग करतात; मात्र धर्माचे मूळ तत्त्व समजून घेणे अत्यावश्यक आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय चिंतक व ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशताब्दी वर्षानिमित्त सकल हिंदू समाज व रामदासपेठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विराट हिंदू संमेलनाच्या समारोपप्रसंगी कुलश्रेष्ठ बोलत होते. रामदासपेठ येथील लेंड्रा पार्क मैदानावर शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी ‘राष्ट्रभक्ती आणि संघटन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
मंचावर निवृत्त नौदल अधिकारी आणि रा. स्व. संघाचे प्रचारक शेखर केळकर, सामाजिक कार्यकर्त्या व भौतिकशास्त्राच्या प्रा. डॉ. लीना गहाणे, मुकेश अग्रवाल, दीपक हेडा, संजय मराठे, नगरसेवक विनय दाणी व शिल्पा रावल उपस्थित होते. तसेच हिमॅटोलॉजिस्ट डॉ. अवतार कृष्ण गंजू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. गंजू यांचा सत्कार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते करण्यात आला.
कुलश्रेष्ठ म्हणाले, ‘नेत्यांनी जनतेच्या निर्णयाचा आदर करावा, अशी जनतेची ताकद निर्माण व्हावी, तेव्हाच खरे सामाजिक परिवर्तन साध्य होईल. हिंदूंचा सगळ्यात मोठा शत्रू हिंदू आहे. सत्तेच्या भरवशावर राहणारे समाज नष्ट होतात. समाजाने स्वतः शक्तिशाली होणे आणि सरकारवर अवलंबून सोडले पाहिजे. सरकारचे काम देश चालवणे आहे, राष्ट्र चालवणे हे समाजाचे काम आहे. देशभर हिंदू मारला जातो आहे. पळून न जाता शत्रूचा सामना त्याच्या भूमीत करायला हवा.’ डॉ. लीना गहाणे यांनी ‘मातृशक्ती आणि तिचे योगदान’ विषयावर विचार मांडले. मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. निखिल कुसुमगर, संचालन अजय पत्की यांनी केले. काचीपुरा आणि लेंड्रा पार्क येथील महिलांनी भारतमाता आरतीचे गायन केले. सुश्रुत गोडसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अमृतवचन वाचून दाखवले. अमृता सोनी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





