पोहरादेवी येथे उद्योगनिर्मितीला चालना देणार

महाराष्ट्र टाइम्स

पोहरादेवी हे धार्मिक स्थळ असून पर्यटनासाठीही महत्त्वाचे आहे. येथे उद्योग निर्मितीला चालना दिली जाईल. पायाभूत सुविधा, रस्ते आणि निवास व्यवस्था सुधारली जाईल. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवात समाजसेवेसाठी सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पोहरादेवी येथे उद्योगनिर्मितीला चालना देणार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पोहरादेवी हे केवळ धार्मिक स्थळ नसून पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी क्षमता असलेले केंद्र आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आवश्यक पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व पर्यटक सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे. पोहरादेवीसारख्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. विकास आणि सामाजिक समरसतेसाठी शासन कटिबद्ध असून पोहरादेवी येथे उद्योग निर्मितीला चालना देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आयोजित ‘श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवा’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन सोहळ्याला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज, आमदार किरण सरनाईक, आमदार सई डाहाके, आमदार राजेश राठोड, आमदार किसन वानखडे, पुसदच्या नगराध्यक्ष मोहिनी नाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संत सेवालाल महाराज यांचे विचार समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव रुजविणारे असल्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष वेधले.

पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने समाजसेवा, सांस्कृतिक कार्य आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात मान्यवरांना ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.