महाज्ञानी ऋषी महर्षी भृगू

महाराष्ट्र टाइम्स

वेदपूर्व काळातील महर्षी भृगू यांनी ज्योतिर्विज्ञान आणि अग्नीचा शोध लावला. ते मानवांचे पूर्वज मानले जातात. त्यांनी अन्नाला भाजून खाण्याची कल्पना दिली. भृगू हे अग्नीचे निर्माते होते. त्यांच्या वंशात च्यवन, जमदग्नी, परशुराम यांसारखे महान संत जन्माला आले. भृगू संहितेतून खगोलीय ज्ञानाची माहिती मिळते. महर्षी भृगू हे परमात्म्याच्या नियामक शक्तीचा भाग होते.

maharshi bhrigu the great sage of fire and astronomy
ज्योतिर्विज्ञान आणि अग्नीचा शोध लावणारे महर्षी भृगू हे वेदपूर्व काळातील महान ऋषी होते. त्यांना मानवांचे पूर्वज मानले जाते. दिवसा सूर्य आणि रात्री अग्नी आपले रक्षण करतो, ही कल्पना त्यांनीच दिली. अन्न भाजून किंवा शिजवून खाल्ल्याने त्याची चव वाढते, हे त्यांनीच जगाला दाखवून दिले. सूर्य म्हणजेच तेजोमय शक्ती हाच आपला देव आणि पालनकर्ता आहे, ही संकल्पना त्यांनीच सर्वप्रथम मांडली. ‘भृज्’ म्हणजे भाजणे या संस्कृत शब्दावरून ‘भृगू’ हा शब्द आला आहे. इंग्रजी संशोधक ‘बर्गेन’ यांच्या मते ‘भृगू’ म्हणजे ‘अग्नी’ होय. यज्ञात लागणारा अग्नी मंत्रोच्चारासह मंथन करून मिळवला जातो, हे आजही सर्वश्रुत आहे. ऋग्वेदातही याचा आधार मिळतो. अग्नी निर्माण करणारे म्हणून भृगूंचा उल्लेख ऋग्वेदात १२ वेळा आला असावा. समुद्रातील पाण्यामध्येही अग्नी असतो, हा शोधही भृगूंनीच लावला.

भृगू कुळातील लोकांनी अनेक यज्ञ केले. अग्नीची प्रतिष्ठापना करणे आणि यज्ञासाठी आवश्यक पदार्थ तयार करण्यात ते निपुण होते. भृगू हे ‘रथकार’ म्हणजेच रथ बनवणारे आणि चालवणारेही होते. त्यांच्या वंशातील लोक अग्नीच्या मदतीने आकाशात उडणारे रथ चालवत असत, असे उल्लेख मिळतात. या तेजस्वी साधनांच्या बळावर त्यांनी मानवजातीवर मोठे उपकार केले. भृगूंच्या वंशात जन्मलेल्यांना ‘भार्गव’ म्हणतात. महर्षी च्यवन, ऋचिक, जमदग्नी आणि भगवान परशुराम (विष्णूचा सहावा अवतार) यांसारखे तेजस्वी महात्मे याच भार्गव गोत्रातील होते. खगोलशास्त्राचे संपूर्ण ज्ञान आणि ज्योतिर्विज्ञानावरील ग्रंथ निर्मितीत त्यांचे योगदान मोठे आहे. आजच्या काळातील पंचांगकर्ते याच ज्ञानाचा उपयोग करतात. आपल्या देशात पुढील १०० वर्षांपर्यंतचे पंचांग तयार आहे, हे या शास्त्राचे महत्त्व दर्शवते.
महर्षी भृगू हे १२ आदित्यांपैकी ‘वरुण’ नावाच्या आदित्य आणि त्यांच्या ‘चार्षिणी’ नावाच्या पत्नीचे पुत्र होते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "महर्षिणाम् भृगुरः" म्हणजेच अनेक महर्षींमध्ये मी भृगू आहे. सत्ययुगात भृगू, मरीची, अत्री, अंगिरा, पुलह, क्रतु, मनु, वसिष्ठ, दक्ष आणि गौतम हे महर्षी तपश्चर्येत श्रेष्ठ होते. कृष्णयजुर्वेदातही त्यांचा उल्लेख आहे. ते अथर्ववेदाचे द्रष्टे होते आणि त्यांचे सहकारी अंगिरस होते, म्हणूनच त्या वेदाला ‘भृग्वांगिरस वेद’ असेही म्हणतात. ‘ भृगू संहिता ’ या ग्रंथातून त्यांनी भारतीय ज्योतिर्विज्ञान आणि खगोलशास्त्राचे ज्ञान सांगितले.

महर्षी भृगूंच्या तीन पत्नी होत्या. पहिली पत्नी दक्षपुत्री ख्याती, जिच्यापासून लक्ष्मी, धाता आणि विधाता ही मुले झाली. दुसरी पत्नी हिरण्यकशिपूची कन्या दिव्या, जिच्यापासून शुक्र आणि त्वष्टा यांचा जन्म झाला. तिसरी पत्नी पुलोमऋषींची कन्या पौलोमी, जिच्यापासून च्यवन नावाचा मुलगा झाला. ही सर्व मुले आयुर्वेदाचे जाणकार होती आणि पुराणांमध्ये ‘कीर्तीमान’ म्हणून ओळखली जातात.

आता एक प्रश्न पडतो की, लक्ष्मी ही भृगूंची मुलगी होती की समुद्रमंथनातून समुद्रातील कमळातून प्रकटलेली लक्ष्मी वेगळी होती? या प्रश्नाचे उत्तर विष्णू पुराणात मिळते. विष्णू पुराणाच्या पहिल्या अंशात (श्लोक १४१ ते १४५) असे म्हटले आहे: "भगोः ख्यात्यां समुत्पन्ना श्रीः पूर्वमुदधेः पुनः । देवदानव यत्नेन प्रसूतामृतमंथने ।।" याचा अर्थ असा की, ख्यातीपासून उत्पन्न झालेली श्री (लक्ष्मी) ही भृगूंची कन्या होती, तर देव आणि दानवांच्या प्रयत्नाने अमृतमंथनाच्या वेळी समुद्रातूनही लक्ष्मी प्रकटली होती.

वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडातील एका प्रसंगात, राजर्षी निमी यांनी केलेल्या महायज्ञात महर्षी भृगू, महर्षी गौतमांबरोबर ऋत्विज म्हणून यज्ञ संपन्न करण्यासाठी आले होते. त्यावेळी ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या शापामुळे निमीचा मृत्यू झाला होता. यज्ञ पूर्ण करण्यासाठी, महर्षी भृगू यांनी राजर्षी निमीच्या आत्म्याला विचारले की, आम्ही तुमच्या मृतदेहात पुन्हा चैतन्य आणू शकतो, तुमची काय इच्छा आहे? वाल्मिकी रामायणात उत्तरकाण्डात (सर्ग ५८, श्लोक १२) असे म्हटले आहे: "ततो यज्ञे समाप्तेतु भृगृस्तत्रेदमब्रवीत् । आनयिष्यामि ते चेतस्तुष्टोsस्मि तव पार्थिव ।।" म्हणजेच, यज्ञ पूर्ण झाल्यावर भृगू म्हणाले, "मी तुझ्यावर प्रसन्न आहे, हे राजा, मी तुझे चैतन्य परत आणू शकेन."

यावरून भृगूंच्या महान सामर्थ्याची कल्पना येते. अचेतन वस्तूंना चेतना देण्याची ‘ईशिता’ नावाची सिद्धी त्यांच्याकडे होती. पिण्ड (शरीर) आणि ब्रह्मांडात (विश्व) एकच परमात्मा व्यापलेला आहे आणि त्याचीच जगत् चालवणारी सत्ता आहे, हे शाश्वत सत्य जे सांगतात, त्यांना ऋषी म्हणतात. महर्षी भृगू हे त्या ईश्वरी शक्तीचाच एक भाग होते. त्यांच्या या महानतेमुळेच त्यांना ‘महर्षी’ म्हटले जाते. साक्षात लक्ष्मी त्यांच्या कन्या रूपात अवतरते, यावरूनही त्यांचा अधिकार कळतो. महर्षी भृगू आणि परमात्म्याच्या चित्शक्ती महालक्ष्मीला शतशः नमन.