करारावर राहुल यांचे पाच प्रश्न

महाराष्ट्र टाइम्स

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमेरिकेच्या दबावापुढे केंद्र सरकार झुकत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय कृषी व्यवस्थेवर दुसऱ्या देशाला कब्जा करण्याची संधी दिली जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या करारातून भविष्यात अधिक पिकांना फटका बसण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

करारावर राहुल यांचे पाच प्रश्न
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारताच्या कृषी क्षेत्रावर परदेशी कंपन्यांना कब्जा करण्याची संधी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. रविवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियाद्वारे पाच प्रश्न विचारले, ज्यात 'ड्राइड डिस्टिलर्स ग्रेन्स' (DDGS) आणि 'जीएम' (जनुकीय सुधारित) मका व सोयाबीन तेलाच्या आयातीमुळे भारतीय शेतकरी आणि दुग्धोत्पादनावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भविष्यात भारताला अधिक पिकांना फटका बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

राहुल गांधी यांनी विचारले की, 'ड्राइड डिस्टिलर्स ग्रेन्स' (DDGS) आयात करणे म्हणजे काय? अमेरिकेतील 'जीएम' (जनुकीय सुधारित) मक्यापासून तयार केलेले पशुखाद्य भारतातील जनावरांना दिले जाणार आहे का? यामुळे भारतीय दुग्धोत्पादक संस्थांवर अमेरिकेच्या कृषी प्रणालीचा वाईट परिणाम होणार नाही का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे विचारले की, जर जीएम सोयाबीन तेलाच्या आयातीला परवानगी दिली, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे काय होईल? त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल का? हा त्यांचा दुसरा प्रश्न होता.

सरकार जेव्हा 'अतिरिक्त उत्पादने' म्हणते, तेव्हा त्यात काय समाविष्ट आहे? भविष्यात अमेरिकेच्या आयातीसाठी डाळी आणि इतर संवेदनशील पिके खुली करण्याच्या दबावाचा हा संकेत आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

'बिगर व्यापारी अडथळे' दूर करणे म्हणजे काय? भविष्यात 'जीएम' पिकांबाबतची आपली भूमिका सौम्य करण्यासाठी आणि इतर सवलती देण्यासाठी भारतावर दबाव आणला जाईल का, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेबरोबरच्या कराराद्वारे एकदा दरवाजा किलकिला केला, की तो अधिक खुला करणे आपण कसे रोखू शकतो? त्यासाठी काही सुरक्षा उपाय आहेत, की प्रत्येक चर्चेवेळी अधिक पिकांना फटका बसेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.