अहंभावाची ‘भूमिका’ बदलली!

Contributed byप्रा. जयप्रकाश अमृतकर,नाशिक|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सटाणा महाविद्यालयात शिकत असताना लेखकाला अहंभावामुळे एकांकिकेतील लहान भूमिका नाकारणे महागात पडले. त्यांनी नाकारलेली भूमिका करणाऱ्या कलाकाराला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. या प्रसंगातून लेखकाने स्वतःची योग्यता ओळखायला शिकले. अहंभाव न बाळगता मिळालेल्या भूमिकाही त्यांनी चांगल्या पार पाडल्या. या अनुभवाने त्यांना आयुष्यभर मार्गदर्शन केले.

the role of ego changed a theatrical experience

स टाणा महाविद्यालयात शिकत असताना (१९७५ ते १९८०) महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात तीन अंकी नाटक सादर केले जायचे. पहिल्याच वर्षी तीन अंकी नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवावर दुसऱ्या वर्षीच्या स्नेहसंमेलनासाठीच्या तीन अंकी नाटकात (घालीन लोटांगण) प्रमुख भूमिका मिळाली. प्रा. अंकुश बांदल यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक चांगलेच गाजले. सटाणा महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या इमारत निधीसाठी या नाटकाचा तिकीट लावून प्रयोग झाला. प्रयोग हाउसफुल झाला होता. यातून कॉलेजसाठी बऱ्यापैकी निधी संकलित झाला होता. या नाटकामुळे महाविद्यालयात चांगला कलाकार म्हणून माझी ओळख निर्माण झाली होती. मी स्वतःला महाविद्यालयाचा सुपरस्टार (?) समजायला लागलो होतो. हे वयच असं असतं. पुढच्या वर्षी पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या युवक महोत्सवासाठी सटाणा महाविद्यालयाला एकांकिका सादर करायची होती. त्या साठी कलाकारांची निवड करण्यात आली. माझीदेखील त्यासाठी निवड झाली. सरांनी कोणी कोणती भूमिका करायची हे सांगितले. मला देण्यात आलेली भूमिका अतिशय लहान होती व त्यातून फारसा प्रभाव पडणार नाही असे वाटले. आपल्याला इतकी छोटी भूमिका कशी देऊ शकतात? (कारण मी सुपरस्टार(?) होतो ना!) असेही वाटले. ‘मला मुख्य भूमिका देणार असाल तर मी भाग घेईन’ असं सांगितलं. मात्र, दिग्दर्शक प्रा. बांदल यांनी ‘दिलेलीच भूमिका करावी लागेल’ असा पवित्रा घेतल्याने मला नाटकात सहभागी केले नाही.

यथावकाश ती एकांकिका पुणे विद्यापीठाच्या युवक महोत्सवात माझ्याशिवाय सादर झाली. त्या एकांकिकेला द्वितीय पुरस्कारही प्राप्त झाला. विशेष म्हणजे मी जी भूमिका नाकारली होती त्या भूमिकेसाठीच्या कलाकाराला उत्कृष्ट अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिकही प्राप्त झाले होते. हा प्रसंग माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. मी यातून शिकलो, की आपण आपली स्वतःची योग्यता ओळखूनच वागायला शिकलं पाहिजे. आपण स्वतःविषयी कोणताही भ्रम मनात बाळगू नये. या जगात कुणाचेही कुणावाचून अडत नाही आणि आपल्यामुळे तर नक्कीच नाही. त्यामुळे कोणताही अट्टहास न करता पुढील दोन-तीन वर्षे मिळेल त्या भूमिका पार पाडल्या आणि त्या भूमिकांचेही कौतुक झाले. कोणताही अहंभाव मनात बाळगला नाही म्हणून प्रमुख भूमिकाच करायला मिळाल्या. मात्र, एका छोट्या प्रसंगातून मिळालेल्या या अनुभवाची शिदोरी आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरली.

अहंभावाची ‘भूमिका’ बदलली!