ठाण्याला नशेचा विळखा

Contributed byमहेश गायकवाडmahesh.gaikwad@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाणे शहरात ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढले आहे. २०२५ मध्ये पोलिसांनी २०० हून अधिक गुन्हे दाखल करत ७८ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे आणि जप्त केलेल्या ड्रग्जच्या प्रमाणात वाढ झाली आहे. परराज्यांतून आणि काहीवेळा परदेशातूनही ड्रग्जची तस्करी होत आहे. एमडीसारख्या नशा करणाऱ्या औषधांच्या निर्मितीमध्येही काही उच्चशिक्षित लोकांचा सहभाग उघड झाला आहे.

ठाण्याला नशेचा विळखा

ठाणे : नशेच्या विळख्यातून शहरांना बाहेर काढून ड्रग्ज तस्करी वर अंकुश आणण्यामध्ये अद्याप पोलिसांना पूर्णपणे यश आले नाही. त्यामुळे ड्रग्ज तस्करी बिनदिक्कतपणे चालू असल्याचे चित्र आहे. ठाणे पोलिसांनी २०२५ मध्ये ड्रग्ज संदर्भात २००हून अधिक गुन्हे दाखल करत ७८ कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. २०२४ या वर्षीच्या तुलनेत मागील वर्षी दाखल गुन्ह्यांच्या संख्येत ७५ ने वाढ झाली आहे. तर, ६२ कोटीहून अधिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. या आकडेवारीवरुन ड्रग्जच्या विरोधातील कारवाईचा आलेख उंचावला असला तरी अनेक कारवायांमधील मुख्य तस्कर पोलिसांच्या हाती लागत नाही. परिणामी, ड्रग्ज तस्करी थांबली नसून तस्करांचा कायमस्वरूपी बिमोड होणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परराज्यांतून, काही वेळेला परदेशातून ड्रग्जची तस्करी होत असून या तस्करीमध्ये काही परदेशी नागरीकांचा सहभाग आढळून येत आहे. गांजा, चरस, कोकेन, एमडीसह अन्य नाविविध प्रकारचे ड्रग्ज तसेच नशेच्या औषधांची होणाऱ्या तस्करीमध्ये टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता आहे. या टोळ्या महाराष्ट्रात ड्रग्जचा पुरवठा करत असून काही दिवसापूर्वी पोलिसांच्या चौकशीत मध्य प्रदेशमधील एक टोळी देशभरात ड्रग्जची तस्करी करत असल्याची बाब उघड झाली होती. मेफोड्रॉन अर्थात एमडीचे कारखाने थाटून कारखान्यात तयार होणारे एमडी चढ्या भावाने विक्री करण्यात येत असून एमडी निर्मितीमध्ये काही उच्चशिक्षितांचा सहभाग आढळला आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे आणि आसपासच्या शहात ड्रग्ज तस्करीमध्ये वाढ झाली आहे. वाढती ड्रग्ज तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसापुढे उभे ठाकले असले तरी ठाणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडत २०२५ या वर्षात अनेक कारवाया केल्या आहेत.

गेल्यावर्षभरात पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांत ड्रग्ज प्रकरणी एकूण २३७ गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ३५५ असून एकूण ७८ कोटी ४८ लाख ७१ हजार ४९९ रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. मात्र, २०२४ वर्षापेक्षा गतवर्षी गुन्ह्यांच्या संख्येच्या संख्येत वाढ झाली असून ही वाढ ७५ इतकी आहे. २०२४ मध्ये १६२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्ह्यातील आरोपींची संख्या २५० तर, जप्त साठ्याची किंमत १६ कोटी ४५ लाख ४४ हजार ६९५ रुपये होती. या आकडेवारीवरून त्यावर्षीपेक्षा मागील वर्षी पोलिसांनी अधिक ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.

पोलिसांनी ड्रग्जच्या विरोधात कारवायांना वेग दिला असला तरी तस्करीची पाळेमुळे खणून काढून मुख्य आरोपींना जेरबंद करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे.