गर्दीनियंत्रणासाठी नियोजन करा

महाराष्ट्र टाइम्स

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आगामी अधिवेशनासाठी गर्दी नियंत्रणाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीसाठी बैठक झाली. सुरळीत आणि सुरक्षित अधिवेशनासाठी सर्व विभागांनी समन्वय साधावा. प्रवेश नियंत्रणासह सुरक्षा, स्वच्छता आणि वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे विभागाने सदस्यांच्या प्रवासाची सोय करावी.

गर्दीनियंत्रणासाठी नियोजन करा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी याबाबत नियोजनाची सूचना सोमवारी यंत्रणांना केली. ‘आगामी अधिवेशन सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करावे. विधानभवन परिसरात शिस्त आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येऊन गर्दी नियंत्रित व्हावी, यादृष्टीने सुरक्षा यंत्रणेने नियोजन करावे’, असे निर्देश राम शिंदे यांनी दिले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, त्याच्या तयारीच्या अनुषंगाने सोमवारी विधान भवनात बैठक झाली. अधिवेशन काळात सुव्यवस्था आणि सुरक्षितता याबाबत दक्षता घेण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या उपाययोजना, वाहनतळ व्यवस्था, डॉक्टरांची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा, उपहारगृहामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा, उपाहारगृहातील स्वच्छता व खाद्यपदार्थांची तपासणी, विधान भवन परिसरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, अखंडित पाणीपुरवठा, याबाबत आढावा घेण्यात आला.

अधिवेशन कालावधीत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी व कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी पर्यायी प्रवेशद्वाराची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश नियंत्रण कडक ठेवावे, वाहनतळ व्यवस्था उचित असावी, सुरक्षा, स्वच्छता व आपत्कालीन सेवा पूर्णतः सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले. रेल्वे विभागाने दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.