लग्नाआधी दक्षता गरजेची!

महाराष्ट्र टाइम्स

सर्वोच्च न्यायालयाने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. विवाहाचे खोटे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने तरुणीला दुबईला जाण्याबाबत प्रश्न विचारले. सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

लग्नाआधी दक्षता गरजेची!
विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणाने दुबईत तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. विवाहापूर्वी तरुण-तरुणी एकमेकांना पूर्णपणे अनोळखी असतात, त्यामुळे लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवताना विचारपूर्वक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणातील तरुणीला 'तुम्ही दुबईला कशासाठी गेलात आणि तिथे शारीरिक संबंध का ठेवले?' असा प्रश्नही न्यायालयाने विचारला.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी केली. एका युवतीने विवाहाचे खोटे आमिष दाखवून दुबईत आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनुसार, संबंधित तरुण आणि तरुणीची ओळख २०२२ मध्ये एका विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटवर झाली होती. तरुणाने आधी दिल्लीत आणि नंतर दुबईत तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तरुणीच्या वकिलांनी न्यायालयात माहिती दिली की, संबंधित तरुण आधीच विवाहित असल्याची माहिती जानेवारी २०२४ मध्ये तरुणीला समजली. यापूर्वी सत्र न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला होता, त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. नागरत्ना यांनी तरुणीला विचारले की, "तुम्हाला दुबईला जाण्याची गरज काय होती?" यावरून न्यायालयाने विवाहापूर्वीच्या संबंधांबाबत सावधगिरीचा इशारा दिला.