दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी गोळीबार करणाऱ्यास पकडण्यात अखेर १५ दिवसांनी मुंबई पोलिसांना यश आले आहे. दीपक शर्मा या शूटरसह गुन्हे शाखेच्या पथकांनी राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून सात जणांना रविवारी अटक केली. या सात जणांना पकडण्यात आल्याने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १२ झाली आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक शुभम लोणकर फरार असून, तो विदेशातून सूत्र हलवत असल्याची माहिती आहे.
रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी ३१ जानेवारीच्या रात्री गोळीबार करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस उपायुक्त, मुंबई गुन्हे शाखा, राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून पाच जणांना यापूर्वी अटक केली होती. पुण्यातून अटक करण्यात आलेल्या या पाच जणांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरच्या सांगण्यावरून मुख्य शूटरला दुचाकी आणि पिस्तुल पुरविले होते. हे पाच आरोपी लवकर पकडण्यात आले, मात्र शूटर आणि इतर आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांचे जाळे तसेच तपास कौशल्याच्या आधारे फरार आरोपी हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने मुख्य शूटर दीपक रमेशचंद्र शर्मा, सनी कुमार, सोनू ठाकूर, रितीक यादव, जतीन भारद्वाज, विशाल ठाकूर, विष्णू कुशवाह या सात जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाने सातही आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आरोपींपैकी दीपक, सोनू, सनी कुमार व आणखी एक फरार आरोपी असे चौघे ३१ जानेवारीच्या रात्री जुहू येथे रोहित शेट्टीच्या घराची रेकी करून गेले. त्यानंतर त्यांनी एका वाईन्स शॉपमधून मद्य खरेदी केल्यानंतर दोघे पुढे निघून गेले आणि दीपक शर्मा आणि सोनू ठाकूर हे दोघे रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करून विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळाले. तेथे दुचाकी पार्क करून रिक्षाने कल्याणला गेले व कल्याण येथून रेल्वेने उत्तर प्रदेश गाठले.





