आसाम काँग्रेसमध्ये रंगले राजीनामानाट्य

महाराष्ट्र टाइम्स

आसाम काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीच्या ऐनवेळी राजीनामा नाट्य घडले. माजी प्रदेशाध्यक्ष भुपेन बोरा यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला. मात्र, राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. या घडामोडींमुळे आसाम काँग्रेसमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आसाम काँग्रेसमध्ये रंगले राजीनामानाट्य
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भुपेन बोरा यांनी सोमवारी सकाळी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, पण काही तासांतच त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. या घडामोडीत भाजपने बोरा यांना पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते.

भुपेन बोरा यांनी आसाम काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून गेल्या वर्षी पायउतार झाले होते. २०२१ ते २०२५ या काळात ते प्रदेशाध्यक्ष होते. मात्र, राज्यातील नेतृत्वाकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. योग्य सन्मान मिळत नसल्याने आणि आसाम काँग्रेसच्या भविष्याची चिंता वाटत असल्याने त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता.
बोरा यांच्या राजीनाम्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी तातडीने त्यांच्याशी संपर्क साधला. आसाम काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनीही बोरा यांना थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही बोरा यांच्याशी बोलून राजीनामा मागे घेण्याचे आवाहन केले. यानंतर, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राज्य प्रभारी जितेंद्र सिंग यांनी बोरा यांनी राजीनामा मागे घेतल्याचा दावा केला. याआधी, सध्याचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी बोरा यांची भेट घेऊन त्यांना समजावले होते.