बारावीचे दोन पेपर फुटले

महाराष्ट्र टाइम्स

बारावीच्या रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. एका हुशार पर्यवेक्षिकेमुळे हे मोठे रॅकेट उघडकीस आले. एका विद्यार्थिनीच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरे सापडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, नागपूरसह इतर शहरांतील संबंधितांचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत कारवाई केली जात आहे. दोषींना कठोर शिक्षा होईल.

12th grade exam papers leaked education board in shock

संबंधित विद्यार्थिनी एका शिकवणी वर्गात जायची. त्या शिकवणी वर्गाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप होता. त्यात प्रश्नपत्रिका पाठविणाऱ्यासह २१ जणांचा समावेश आहे. प्रश्नपत्रिका पाठविणारा एका खासगी शिकवणी वर्गाशी संबंधित असल्याने शिकवणी वर्ग व त्याच्याशी संबंधित इतर लोक पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी त्या व्यक्तीला शिक्षण मंडळाशी संबंधित असलेल्या एकाने प्रश्नपत्रिका पाठविली. पेपरफुटीचे रॅकेट नागपूरसह अन्य शहरांत सक्रिय आहे का, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, रॅकेटमध्ये सामील असलेल्या इतरांचा शोध घेतला जात आहे. एका पर्यवेक्षकाच्या दक्षतेमुळे पेपरफुटीचे हे रॅकेट उघडकीस आले.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सिव्हिल लाइन्समधील सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल या केंद्रावर बुधवारी बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर होता. पेपर देणारी एक विद्यार्थिनी वारंवार लघुशंकेसाठी जात होती. त्यामुळे पर्यवेक्षकाला तिच्यावर संशय आला.

शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आली असता तिच्याकडे मोबाइल आढळला. शिक्षिकेने तिला मोबाइलचा पासवर्ड टाकायला सांगितले. मोबाइलचे लॉक उघडताच व्हॉट्सॲपवर रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका आढळली. त्याखाली प्रश्नांची उत्तरेही होती. या घटनेची माहिती शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. या विद्यार्थिनीच्या मोबाइलची पाहणी केली असता सोमवारी झालेल्या भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका व प्रश्नांची उत्तरेही त्यात सापडली. परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी ही उत्तरे तिला व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर शिक्षणाधिकारी अनिल दहिफळे यांनी सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विद्यार्थिनीला प्रश्नपत्रिका पाठविणारा मोबाइलधारक व शिक्षण मंडळाच्या एका संशयिताविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

‘कोणालाही सोडणार नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कॉपीमुक्त अभियान सुरू केले आहे. त्यानुसार शनिवारी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी छत्रपती चौकातील संताजी कॉलेज येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. ‘नागपुरात बारावीच्या पेपरफुटीचे प्रकरण जागरूक पर्यवेक्षकाने उघडकीस आणले. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौकशी सुरू आहे. या प्रकरणात खासगी कोचिंगचा संचालक असो, व्यक्ती असो वा प्रशासनातील व्यक्ती असो, कोणीही दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,’ अशी माहिती गृहराज्यमंत्री भोयर यांनी दिली. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत गोंदियातील केंद्रावर सापडलेल्या डमी परीक्षार्थ्याचे नागपूर कनेक्शन समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील गिरीजाबाई कन्या हायस्कूलच्या केंद्रावर शुक्रवारी दहावीचा मराठीचा पेपर झाला. तपासणीदरम्यान या केंद्रावर डमी परीक्षार्थी आढळून आला. मूळ परीक्षार्थी व डमी हे दोघेही नागपुरातील आहेत.