पुणे : पुणे शहराची ओळख ‘ स्मार्ट सिटी ’ म्हणून होत असली, तरी पादचाऱ्यांसाठी मात्र हे शहर ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहे. शहरातील अपघाती मृत्यूंमध्ये ३० ते ३५ टक्के वाटा पादचाऱ्यांचा असून, पुण्याचे पदपथ आता चालण्यायोग्य राहिलेले नाहीत. अतिक्रमण, बेकायदा पार्किंग आणि प्रशासकीय अनास्थेमुळे ‘चालण्यायोग्य शहर’ ही संकल्पना केवळ कागदावरच उरली असून, पादचाऱ्यांनी नक्की चालायचे कुठे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
बेकायदा फेरीवाले आणि स्टॉल्सधारकांनी लक्ष्मी रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता (एफसी रस्ता), जंगली महाराज रस्ता, कोथरूड, विमाननगर, कॅम्प परिसर, सिंहगड रस्ता व्यापला आहे. पदपथांचा वापर आता दुचाकी पार्किंगसाठीही करण्यात येऊ लागला असून, फर्ग्युसन रस्त्याची डावी बाजू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता असो, की आलिशान ‘एफसी-जेएम’ रस्ता, सर्वत्र पदपथांवर व्यावसायिकांचेच ‘राज्य’ आहे. कुठे दुकानांचे बोर्ड, कुठे शोभेच्या कुंड्या, तर कुठे हॉटेलच्या ग्राहकांसाठी टाकलेले कट्टे. उपनगरांमध्ये तर परिस्थिती याहून भयावह आहे. हडपसर, मांजरी रस्त्यांवर पदपथ म्हणजे गॅरेजचे साहित्य आणि भंगार विक्रेत्यांचे हक्काचे अड्डे झाले आहेत.



