ज्येष्ठ लेखक सुनीतपोतनीस यांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स

ज्येष्ठ लेखक, अभ्यासक आणि मुद्रण तंत्रज्ञ सुनीत विष्णू पोतनीस यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी 'गांवकरी'चा मुद्रण विभाग अनेक वर्षे सांभाळला. इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये सदरे लिहिली. त्यांची तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत. नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

demise of veteran writer sunet potnis

ज्येष्ठ लेखक, अभ्यासक व मुद्रण तंत्रज्ञ सुनीत विष्णू पोतनीस (८२) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक क्षेत्रांतील जाणकार व अभ्यासू लेखक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पोतनीस काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पश्चात मुलगी प्राची पोतनीस-देवस्थळी, जावई सचिन देवस्थळी व नातवंडे असा परिवार आहे. एक ऑगस्ट १९४४ रोजी जन्मलेले पोतनीस विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर होते. मुद्रण तंत्रज्ञानातील ते जाणकार होते. त्यांनी ‘गांवकरी’चा मुद्रण विभाग पाच दशकांहून अधिक काळ सांभाळला व त्यात नवनवीन प्रयोग केले. त्यांना इतिहासाचे प्रचंड कुतूहल होते. युरोप, पश्चिम आशियातील देश व भारतीय मध्ययुगीन इतिहासाचे ते अभ्यासक होते. ऐतिहासिक वास्तू व वस्तू अवशेषांच्या अभ्यासासाठी ते अनेक देश फिरले. नोकरीतून निवृत्त झाल्यावर वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, पुण्यनगरी आदी वृत्तपत्रांत सदरे लिहिली. ‘बखर संस्थानांची’, ‘जे आले ते रमले’ व ‘शोध बदलत्या पृथ्वीचा’ अशी त्यांची राजहंस प्रकाशनाने काढलेली तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रकृती बरी नसतानाही अखेरच्या क्षणापर्यंत ते लिहित होते. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.