माजी महापौरांविरुद्धअत्याचाराचा गुन्हा

महाराष्ट्र टाइम्स

अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर एका तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. नोकरीचे आमिष दाखवून पुणे आणि नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अत्याचार केल्याचे तरुणीने म्हटले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप अटक झालेली नाही. तरुणीने व्हिडिओ पुरावेही पोलिसांना दिले आहेत. कळमकर यांनी यापूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

former mayor of ahilyanagar charged with assault
अहिल्यानगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर एका तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पुणे आणि नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, अद्याप त्यांना अटक झालेली नाही.

पीडित २५ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अभिषेक कळमकर यांनी तिला शाळेत नोकरीचे आमिष दाखवले. विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी संपर्क वाढवला आणि त्यानंतर अत्याचार केले. नगर शहरातील विविध ठिकाणांसह पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर नेऊन तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. इतकेच नाही, तर मोबाइलवर व्हिडिओ कॉल करून कपडे काढण्यास भाग पाडले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली, असा गंभीर आरोप तरुणीने केला आहे. या आरोपांना पुष्टी देण्यासाठी तरुणीने काही व्हिडिओ पुरावे म्हणून पोलिसांना सादर केले आहेत. विशेष म्हणजे, अभिषेक कळमकर यांनी यापूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता.