‘सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असणे हे राज्यघटनेने बहाल केलेले सर्वोच्च पद आहे. त्यामुळे या पदावरून निवृत्त झाल्यानंतर सरकारी, निमसरकारी पेशात दुसरे पद स्वीकारणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आता त्या पदाला साजेसे विनामूल्य विद्यादान करून सामाजिक भान जपणार आहे,’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी नुकतेच ठाण्यात ‘ग गप्पांचा’ कार्यक्रमात बोलताना केले. अभय मराठे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
‘या व्यवसायात धमक्या, बदनामीची टांगती तलवार याचे दडपण असतेच, पण मी योग्य निवाडा करेन हे एकदा मनाशी ठरवले की आपले काम सोपे होते. चित्रपटात दाखवले जाणारे कोर्ट आणि सत्य परिस्थिती वेगळीच असते,’ असे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या सुट्ट्यांबाबतही त्यांनी खुलासा केला. सुट्टीच्या काळातही न्यायाधीशांचे एक खंडपीठ कार्यरत असते. खटल्याचा निकाल देण्यापूर्वी न्यायाधीशांना त्याचा प्रचंड अभ्यास करावा लागतो. दिवसातील आठ ते दहा तास वाचन करावे लागते, अशी माहिती त्यांनी दिली. श्रोत्यांनी न्यायालयीन कामकाजाबाबत कुतूहलाने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी विस्तृतपणे उत्तरे दिली. तपस्या नेवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



