Gun And Pen Controversial Memoirs Of Military Officials
बंदूक नि लेखणी
Contributed by: सचिन दिवाण|महाराष्ट्र टाइम्स•
जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकामुळे पुन्हा एकदा लष्करी आणि राजकीय नेतृत्वातील मतभेद चर्चेत आले आहेत. भूतकाळातील अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुस्तकांतून असेच अनुभव मांडले आहेत. यातून संरक्षण यंत्रणेतील त्रुटी आणि सुधारणांची गरज अधोरेखित होते. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षातून भारताच्या संरक्षण सज्जतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवृत्त अधिकाऱ्यांची पुस्तके मार्गदर्शक ठरली आहेत.
माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज मुकुंद नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी - अॅन ऑटोबायोग्राफी’ या पुस्तकावरून सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसतानाही, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत या पुस्तकाचा आणि त्यावर आधारित लेखाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप नेत्यांनी पुस्तक प्रकाशित न झाल्याने त्याचा हवाला देता येणार नाही, असे सांगत विरोध केला. काँग्रेसने आरोप केला की, पुस्तकात सरकारला अडचणीत आणणारा मजकूर असल्याने सरकारने ते दोन वर्षांपासून प्रकाशित होऊ दिले नाही. या पुस्तकातील उल्लेखानुसार, देशाचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व यांच्यात काही प्रमाणात मतभेद दिसून येतात. हा काही पहिलाच प्रसंग नाही, भूतकाळातही असे अनेक प्रसंग घडले आहेत, ज्यांची नोंद लष्करी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या आत्मचरित्रांमध्ये केली आहे. या पुस्तकांमधून देशाच्या संरक्षण सज्जतेवर आणि धोरणांवर प्रकाश टाकला जातो, तसेच यंत्रणेतील त्रुटीही समोर येतात.
जनरल (निवृत्त) मनोज मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्रावरून सुरू झालेला वाद हा केवळ एका पुस्तकापुरता मर्यादित नाही, तर तो देशाच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वातील संबंधांवर एक नवा प्रकाश टाकतो. राहुल गांधी यांनी संसदेत या पुस्तकाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केला, पण सत्ताधारी भाजपने ते प्रकाशित झाले नसल्याचे कारण देत विरोध केला. काँग्रेसचा आरोप आहे की, सरकार या पुस्तकाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्यात सरकारला अडचणीत आणणारी माहिती आहे. या पुस्तकातून राजकीय आणि लष्करी नेतृत्वातील काही मतभेद समोर येण्याची शक्यता आहे, जी भूतकाळातील अनेक घटनांशी मिळतीजुळती आहे.भूतकाळातही असे अनेक प्रसंग घडले आहेत, जेव्हा राजकीय आणि लष्करी नेतृत्वात मतभेद निर्माण झाले होते. या मतभेदांची नोंद अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुस्तकांत केली आहे. उदाहरणार्थ, ब्रिगेडियर सी. बी. खांडुरी यांनी लिहिलेल्या ‘फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा - हिज लाइफ अँड टाइम्स’ या चरित्रात, स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानचे काही प्रसंग नमूद केले आहेत. जानेवारी १९४८ मध्ये, लेफ्टनंट जनरल पदावर असलेले करिअप्पा पश्चिम विभागाचे प्रमुख होते. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कारवायांचे नेतृत्व केले. मात्र, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांत नेल्याने करिअप्पा आणि इतर अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी नाराज होते. संयुक्त राष्ट्रांनी सुचवलेली युद्धबंदी भारताने जून १९४८ पर्यंत मान्य केली होती, पण पाकिस्तानने कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. या पुस्तकानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या युद्धबंदीची घाईघाईने अंमलबजावणी करताना, भारत सरकारने अर्धवट जम्मू-काश्मीर स्वीकारले आणि पाकिस्तानने बळकावलेला भूभाग पूर्णपणे मुक्त करण्याचे ध्येय सोडून दिले. याचा देशाच्या सुरक्षेवर दूरगामी परिणाम झाला, असे या पुस्तकात म्हटले आहे. ६ जुलै १९४८ रोजी, लष्करी मुख्यालयाने करिअप्पा यांना जम्मू-काश्मीरमधील सर्व आक्रमक कारवाया थांबवण्याचे आदेश दिले. याला विरोध केल्यावर, केवळ आतापर्यंत मिळालेले यश टिकवण्यासाठी कारवाया करण्याची परवानगी मिळाली. करिअप्पा यांच्या मते, हा एक मोठा घोडचूक होती, असे या पुस्तकात नमूद केले आहे.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले, त्यापूर्वीच भारताने अक्साई चीनचा बराचसा भूभाग गमावला होता. या युद्धात चिनी सैन्याने भारतीय भूभागात आणखी आत प्रवेश केला. या युद्धावर अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिले आहे. लेफ्टनंट जनरल बी. एम. कौल यांना युद्धातील अपयशाचा ठपका डोक्यावर घेतल्याने राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी निवृत्तीनंतर ‘द अनटोल्ट स्टोरी’ नावाचे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकावरून १९६७ साली संसदेतही मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी, कौल यांनी प्रसिद्धीपूर्वी पुस्तकाचा मजकूर संरक्षण मंत्रालयाकडून तपासून घेतला होता की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच, त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करून अटक करण्याची मागणीही झाली होती.
लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील (एसपीपी) थोरात यांचे ‘माझी शिपाईगिरी’ (मूळ इंग्रजी नाव – From Reveille to Retreat) हे आत्मचरित्र चीन युद्धाबद्दल महत्त्वाची माहिती देते. थोरात यांनी युद्धाच्या एक वर्ष आधीच राजीनामा दिला होता. साधारण १९६० च्या दशकात, थोरात लेफ्टनंट जनरल पदावर होते आणि त्यांची लखनऊ येथे लष्कराच्या पूर्व विभागाच्या प्रमुखपदी नेमणूक झाली होती. चीनने तिबेट गिळंकृत केले होते आणि भारतीय सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरू होती. थोरात यांनी १९५९ सालीच चीनच्या संभाव्य हल्ल्याविषयी एक गुप्त अहवाल तयार केला होता. या अहवालानुसार, त्यांनी ‘लाल किला’ नावाचा लष्करी सरावही घेतला होता आणि प्रतिकाराची योजना आखली होती. ही माहिती त्यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना पाठवली होती. मात्र, मेनन यांनी थोरात उगाचच युद्धखोर वृत्ती दाखवत आहेत, असे म्हणत या अहवालाकडे दुर्लक्ष केले. हा अहवाल पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहोचलाच नाही. त्यावेळी थोरात आणि मेनन यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल थिमय्या यांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर जनरल पदासाठी थोरातांचे नाव चर्चेत होते, पण त्यांना कधीच जनरलपदी बढती मिळाली नाही. युद्ध संपत आले तेव्हा नेहरू आणि थोरात यांची भेट झाली. खरी परिस्थिती समजल्यावर नेहरूंनी थोरातांना नव्याने स्थापन होत असलेल्या संरक्षणविषयक सल्लागार मंडळाचे (नॅशनल डिफेन्स काऊन्सिल) सदस्यत्व दिले, पण तोपर्यंत युद्ध संपले होते.
मेजर जनरल डी. के. पलिट यांचे ‘वॉर इन हाय हिमालय - द इंडियन आर्मी इन क्रायसिस, १९६२’ हे पुस्तकही चीन युद्धावर प्रकाश टाकते. या पुस्तकात, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ पातळीवर निर्णय प्रक्रियेत असलेली कामचलाऊ वृत्ती, राजकीय नेतृत्वाचा लष्करी प्रक्रियेत हस्तक्षेप, आणि लष्करी नेतृत्वात समन्वयाचा अभाव यांसारख्या बाबींवर बोट ठेवले आहे. ब्रिगेडियर जॉन पी. दळवी यांनी १९६२ सालच्या युद्धावर लिहिलेले ‘द हिमालयन ब्लंडर’ हे पुस्तकही खूप गाजले होते. दळवी यांनी पराजयाचे विश्लेषण करताना म्हटले होते की, हे राष्ट्रीय पातळीवरील, हिमालयाएवढे मोठे अपयश होते. यात सरकार, सेनादले, विरोधी पक्ष, प्रसारमाध्यमे, म्हणजेच राज्यव्यवस्थेची सर्वच अंगे दोषी होती.
१९६५ साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धातील कामगिरीबद्दल तत्कालीन हवाईदल प्रमुख अर्जन सिंग यांना ‘मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स’ हा किताब देण्यात आला. त्यांचे ‘द आयकॉन’ या शीर्षकाचे चरित्र एअर कमोडोर जसजित सिंग यांनी लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तत्कालीन संरक्षणमंत्री मेनन वगळता, सर्वांना १९६२ सालचे युद्ध होणार हे दिसत होते. युद्धासाठी भारताची तयारी नव्हती. मेनन यांचा अनेक केंद्रीय मंत्री आणि लष्करी अधिकारी यांच्याबरोबर असलेला वाद याला बऱ्याच अंशी कारणीभूत होता. भारताने १९६२ च्या युद्धात हवाईदल आक्रमक भूमिकेत वापरलेच नाही. यामागे अपुरी तयारी, जुनाट शस्त्रसामग्री आणि चीनच्या क्षमतांचे योग्य आकलन नसणे, ही कारणे होती, असे लेखकाने म्हटले आहे. त्यानंतर १९६५ साली पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात भारतीय हवाईदलाची अनेक विमाने जमिनीवरच नष्ट झाली. याला हवाईदलाचा बेजबाबदारपणा कारणीभूत होता, असे सिंग यांनी म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात डिसेंबर १९७१ मध्ये लढले गेलेले बांगलादेशमुक्ती युद्ध निर्णायक ठरले. मार्च १९७१ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांना युद्धाबाबत विचारले होते. तेव्हा, माणेकशा यांनी सांगितले होते की, पावसाळा तोंडावर आलेला आहे. पावसाळ्यात बांगलादेशात हालचाली करणे जिकिरीचे ठरेल. सैन्याला तयारीसाठी अजून वेळ द्यावा. हिवाळ्यात युद्ध केले तर जिंकण्याची हमी देऊ शकतो. हा वृत्तांत लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंग यांनी लिहिलेल्या ‘फिल्ड मार्शल सॅम माणेकशा- सोल्जरिंग विथ डिग्निटी’ या चरित्रात आहे.
कारगिलमध्ये १९९९ मध्ये झालेल्या युद्धावेळी जनरल व्ही. पी. मलिक हे लष्करप्रमुख होते. त्यांनी ‘कारगिल - फ्रॉम सर्प्राइज टू व्हिक्टरी’ हे पुस्तक लिहिले आहे. वास्तविक, पाकिस्तानने अचानक केलेली चाल वेळेत न समजल्याबद्दल लष्करावर टीका होत होती. या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न मलिक यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे. युद्धापूर्वी भारत आवश्यक ती गुप्त माहिती मिळवू शकला नाही. युद्धात राजकीय नेतृत्वाने ‘नियंत्रण रेषा’ (एलओसी) पार करण्यास परवानगी दिली नव्हती, त्यामुळे अनेक अडचणी उभ्या राहिल्या. यापुढे राजकीय आणि लष्करी नेतृत्वात अधिक समन्वयाची गरज आहे, असे मलिक यांनी पुस्तकात म्हटले आहे.
भारताने लढलेल्या प्रत्येक युद्धानंतर राजकीय आणि लष्करी नेतृत्व यांच्यातील काही मुद्द्यांवरील मतभेद पुढे आले आहेत. सेनादलातील अनेक अधिकाऱ्यांनी तो पुस्तकरूपाने शब्दबद्ध केला आहे. त्यातून काही सुधारणाही घडल्या आहेत. पण, २०२० मध्ये लडाख प्रदेशात चीनशी झालेली चकमक आणि गतवर्षी पाकिस्तानबरोबर झालेले ‘ऑपरेशन सिंदूर’ या दोन्ही वेळी हा वाद पुन्हा उपस्थित झाला. त्याने देशाच्या संरक्षणसज्जतेवरही शंका घेतली जाऊ लागली.
माजी लष्करी अधिकारी आणि दिल्लीतील ‘फोर्स’ या संरक्षणविषयक नियतकालिकाचे संपादक प्रवीण साहनी यांनी ‘ड्रॅगन ऑन अवर डोअरस्टेप’ आणि ‘द लास्ट वॉर’ आदी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लिखाणानुसार, चीन आणि भारत यांच्या संरक्षण क्षमतांमधील अंतर खूपच वाढले आहे. चीनचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी भारताला अद्याप बरीच मजल मारायची आहे. त्याचवेळी, पाकिस्तानने भारताच्या तुलनेत असलेल्या क्षमतांमधील दरी वेगाने भरून काढली आहे. त्यामुळे आता भारत पाकिस्तानवर सहजासहजी मात करण्याच्या स्थितीत नाही. गलवान संघर्ष आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या घटनांनी हे पुरेसे स्पष्ट केले आहे.
एकूणच, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची पुस्तके अनेक अर्थांनी मार्गदर्शक ठरली आहेत आणि यंत्रणेतील त्रुटी दर्शवून देणारी ठरली आहेत, यात शंका नाही. ही पुस्तके केवळ भूतकाळातील घटनांचे विश्लेषण करत नाहीत, तर भविष्यातील धोरणे आखण्यासाठीही महत्त्वाची दिशा देतात.