‘हिंद दी चादर’साठी खारघर चकाचक

महाराष्ट्र टाइम्स

खारघर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 'हिंद दी चादर' कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने शहर सुशोभित केले जात आहे. पनवेल महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून पदपथ, चौक दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामे वेगाने करत आहे. वर्षानुवर्षे रखडलेली कामेही मार्गी लागत आहेत. नागरिक या बदलाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

‘हिंद दी चादर’साठी खारघर चकाचक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

खारघर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ‘ हिंद दी चादर ’ कार्यक्रमाच्या निमित्ताने शहर चकाचक करण्याचे काम वेगाने सुरू आहे. केंद्र सरकारच्या कार्यक्रमासाठी पनवेल महापालिका स्वतःच्या तिजोरीतील कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. पदपथ, चौक दुरुस्ती, सुशोभिकरण आणि रंगरंगोटीची कामे पनवेल महापालिका लगीनघाईप्रमाणे करीत आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत खारघरमध्ये २८ फेब्रुवारी रोजी ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम होणार आहे. केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाचा कार्यक्रम असूनही तो यशस्वी करण्यासाठी सिडको, महसूल आणि पनवेल महापालिका प्रशासनाला कामाला जुंपविण्यात आले आहे. शहर चकाचक करण्याची मोहीम वेगाने सुरू झाली आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर पदपथ दुरुस्ती, चौकांचे सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि प्रकाशयोजनेची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत.

शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, तुटलेले पदपथ दुरुस्त करणे, रस्त्यांच्या दुभाजकांवर सजावटीची रोपे लावणे, तसेच प्रमुख चौकांना आकर्षक स्वरूप देणे अशी कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे रखडलेली दुरुस्तीची कामेही या निमित्ताने मार्गी लागत असल्यामुळे नागरिकही आश्चर्यचकीत आहेत. एरवी वारंवार मागणी करूनही कासवगतीने काम करणारे पालिका प्रशासन इतके वेगाने का धावते आहे, असा प्रश्न जागरूक नागरिकांना पडला आहे.

कार्यक्रमस्थळ परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून, भिंतींना नव्याने रंगरंगोटी केली जात आहे. विद्युत रोषणाई आणि दिशादर्शक फलक लावण्याची कामेही वेगात सुरू आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा घेत आहेत. या खर्चाबाबत नागरिकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे खारघरला राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळणार असल्याचे मत काहींनी व्यक्त केले तर, स्थानिक विकासकामांसाठीचा निधी कार्यक्रमासाठी वळवला जात असल्याबद्दल काहींनी नाराजी दर्शवली. कार्यक्रमामुळे शहराचा चेहरामोहरा बदलत असला, तरी हा बदल तात्पुरता ठरणार की दीर्घकालीन विकासाचा भाग ठरणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.