बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष उलटून गेले आहे. मात्र, अजूनही या गुन्ह्यातील कृष्णा आंधळे हा आरोपी पोलिसांना सापडलेला नाही. मात्र, या दरम्यान तो त्याच्या गावी तीनदा येऊन गेला असल्याचा धक्कादायक आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. शनिवारी बीडच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणी दोषींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. मात्र, चौदा महिने उलटूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाही. आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडला नाही. मात्र, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी फरारी असलेल्या कृष्णा आंधळे सहा महिन्यांत तीन वेळा त्याच्या मूळ गावी येऊन गेल्याचा दावा केला आहे. ‘तो फोन वापरत नाही. आपण सीआयडीला याबद्दल माहिती दिली आहे,’ असे देशमुख म्हणाले. पोलिसांनी त्याला लवकर जेरबंद करावे. त्याची जिल्हाभर धिंड काढावी, अशी मागणीही त्यांनी केली.



