पेयात गुंगीचे औषधमिसळून अत्याचार

महाराष्ट्र टाइम्स

अमरावती येथे कॉलेजच्या पार्टीत विद्यार्थिनीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला. चंद्रपूरमध्ये एका शिक्षकाने आठवीतील विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केले. वाशिममध्ये एका शेतकऱ्याने शेतात आत्महत्या केली. या घटनांनी समाजात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

shocking incident of drugging and assault at college get together
कॉलेजच्या गेट-टुगेदर पार्टीत एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचे व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत आरोपींनी विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर सात-आठ महिने तिला ब्लॅकमेल केले. या प्रकरणी चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चंद्रपूरमध्ये एका शाळेत वर्गशिक्षकाने आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, त्यालाही अटक करण्यात आली आहे. तर वाशीममध्ये एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेत, कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या गेट-टुगेदर पार्टीत एका विद्यार्थिनीला पेयात गुंगीचे औषध मिसळून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तिला सात-आठ महिने ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. चेतन गणेश अंबाडकर आणि आकाश गणेश अंबाडकर (दोघेही रा. निर्मला कॉलनी, बडनेरा) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना २६ मे २०२५ रोजी रहाटगाव येथील एका हॉटेलमध्ये घडली.
चंद्रपूर शहरात एका नामांकित शाळेत वर्गशिक्षकाने इयत्ता आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरुवारी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गोवर्धन गोंडाणे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. महिला पोलिस कर्मचाऱ्याने साध्या वेशात शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी सहा मुलींनी या शिक्षकाच्या कृत्यांचा पाढाच वाचला. या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली.

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पांगरी नवघरे येथे शेतकरी राजू कालापाड यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. राजू कालापाड यांच्याकडे वडिलोपार्जित सहा एकर शेती होती आणि त्यांचे दोन भाऊ आहेत. ते शेतीसोबतच मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी कोणालाही न सांगता ते घरातून निघून गेले होते. कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला, पण ते कुठेही आढळून आले नाहीत. २१ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृतदेह शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. राजू यांच्या पश्चात त्यांची पत्नी उषा, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.