शक्तिपीठ मार्गाविरोधात २३ रोजी आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स

शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत २३ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या प्रकल्पाविरोधात मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गोलमेज परिषद आयोजित केली जाईल. आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. राजू शेट्टी यांनी परभणी आणि लातूरमधील घटनांचा निषेध केला. या आंदोलनातून महामार्गाला स्थानिकांचा विरोध स्पष्ट होत आहे.

statewide protest against shaktipith highway on february 23

शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या २३ फेब्रुवारीला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असून, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या बैठकीत शनिवारी करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील नेत्यांची ऑनलाइन झूम मीटिंग काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पार पडली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर राज्य सरकार शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुढे रेटत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर बारा जिल्ह्यांतील शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. बैठकीत २३ फेब्रुवारी रोजी राज्यभर जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्याचा आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुंबईत गोलमेज परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग सरकारने करू नये. ‘लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार नाही,’ असे आश्वासन देऊनही मुख्यमंत्र्यांनी भूमिका बदलली. महामार्गासाठीचा निधी सध्याच्या खड्डेमय रस्त्यांवर खर्च करावा, मोजणीला विरोध करावा आणि ग्रामसभांचे ठराव करावेत.’ २३ फेब्रुवारीला राज्यभर आंदोलन छेडणार असून विधिमंडळातही आम्ही ठाम भूमिका मांडू, असा इशाराही त्यांनी दिला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणी आणि लातूरमधील घटनेचा निषेध केला. कोणतेही नेतृत्व नसताना शेतकरी रस्त्यावर उतरले, यावरून शक्तीपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. काही जण गैरसमज पसरवत असून, प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होणार असल्याची भावना लोकांमध्ये आहे, असा आरोप त्यांनी केला. आमदार कैलास पाटील, माजी आमदार ऋतुराज यांनीही विरोध दर्शविला.